कश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री

जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील सोपोर येथे आज लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. चकमक सुरूच असून दोन दहशतवाद्यांना लष्कराने घेरल्याचे वृत्त आहे. गुज्जरपेटी जालुराच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली आहे. किश्तवाडमध्ये दहशतवादी सक्रीय असल्याचा संशय असल्याने लष्कराने चार दहशतवाद्यांची छायाचित्रे जारी केली आहेत. प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपाताची घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

दहशतवाद्यांवर पाच लाखांचे बक्षीस

किश्तवाड जिह्यात चार दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. हे दहशतवादी डोंगराळ भागात, जंगलात लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी त्यांची शोधमोहीम राबवायला सुरुवात केली आहे. किश्तवाड पोलिसांनी या चार दहशतवाद्यांची पोस्टर्स जारी केली असून त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. दहशतवाद्यांची माहिती सांगणाऱयांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सैफुल्लाह, फरमान, आदिल आणि शायद बाशा अशी या दहशतवाद्यांची नावे असून त्यांचे पोस्टर्स उर्दू आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये जारी करण्यात आले आहेत. चारही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात आले आहे.