वाहनचालकाने घेतला पोलिसाच्या हाताचा चावा, मानखुर्द येथील घटना

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच्या हाताला वाहनचालकाने चावा घेतल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक मोहम्मद खानविरोधात गुन्हा नोंद केला.

तक्रारदार हे मानखुर्द वाहतूक विभागात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात. शनिवारी ते टोविंग व्हॅनवर काम करत होते. तेव्हा रस्त्याच्या मधोमध एक टेम्पो उभा होता. वाहतुकीला अडथळा आणल्याने त्या टेम्पोवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आली. त्या वाहनाला टोचन करून मानखुर्द वाहतूक चौकीत नेले जात होते तेव्हा मानखुर्दच्या मंडाला येथे एक जण आला. त्या चालकाने गाडी सोडून देण्यास सांगून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला तक्रारदार यांनी शांत राहण्यास सांगितले. त्याने पोलिसाच्या अंगठय़ाला चावा घेतला. या घटनेची माहिती मानखुर्द वाहतूक विभागाला कळवण्यात आली.