चुकीच्या पद्धतीने कर कपात मिळवणाऱ्यांविरुद्ध आयकर विभागाने धडक कारवाई केली आणि जवळपास 90,000 करदात्यांकडून दावा केलेल्या चुकीच्या परताव्यांची 1,070 कोटी रुपयांची रक्कम वसूल केली. संबंधित करदात्यांनी 2023-24 ते 2024-25 या आर्थिक वर्षांसाठी सुधारित ‘इन्कम टॅक्स रिटर्न्स’ (आयटीआर) फाईल केला होता. तसेच गुंतवणूक, मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक कर्जावरील व्याज, धर्मादाय संस्था आणि राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्या यावर करकपातीचा दावा केला होता. त्यामुळे करदात्यांकडून देय असलेल्या करांमध्ये कपात झाली होती. सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे 90 हजार करदात्यांना चुकीच्या पद्धतीने करकपातीचा दावा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयकर विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली.