>> विनायक
उत्तर हिंदुस्थानात हिमवर्षाव सुरू झाल्याने महाराष्ट्रातही गार वारे वाहून थंडीचा प्रभाव वाहणार अशी वृत्तं, जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात येऊ लागली. दरम्यान आता संक्रांतीपासून सूर्य, पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे, भासमान भ्रमण करू लागल्याने ‘दिवस’ हळूहळू ‘मोठे’ होतायत आणि ‘रात्री’ लहान. 21 डिसेंबरलाच खऱया अर्थाने सूर्याचे ‘उत्तरायण’ सुरू झाल्याने आता थंडी मार्चअखेरीस ओसरेल. कारण तोपर्यंत सूर्य विषुववृत्तावर आलेला असेल. परंतु तोपर्यंतच्या शीतकाळात स्थलांतरित पक्ष्यांचं दर्शन आणि फोटोग्राफीचा आनंद घेता येईल. या मनोहारी मूक जिवांच्या जीवनचक्रांचा थोडक्यात आढावा आपण या सदरातून घेतोय. याचं कारण म्हणजे वर्षभरात फुलणारी विशिष्ट फुलं किंवा दिसणारे पक्षीगण इत्यादी गोष्टींकडे कधीतरी आपलीही नजर जावी. यामध्ये निखळ आणि निःशुल्क मनोरंजन तर आहेत, पण विज्ञानही आहे.
विश्वातील प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही वैज्ञानिक तत्त्व दडलेलं असतं. त्यातली बरीचशी ‘रहस्यं’ आपल्याला आजही अज्ञात आहेत. ती ‘ज्ञात’ करून देणारे शोध (म्हणजे ‘डिस्कव्हरी’) लागतात तेव्हा त्यामागचा सिद्धांत (थिअरी) समजतो. पृथ्वीवर सुमारे 80 लाख सुक्ष्म आणि महाकाय सजीव आहेत. आपल्याकडच्या प्राचीन कल्पनेत ही संख्या 84 लाख होती हेही लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात काय, प्रत्येक काळातील मानवी पुतूहल आणि जिज्ञासा तसंच संशोधक वृत्ती काळानुसार नित्यनवी प्रमेयं मांडत असते.
आपल्या अल्पशा ‘पक्षीपुराणा’तील महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांची हजारो किलो मीटर उडण्याची क्षमता आणि अगदी योग्य दिग्दर्शन स्वतःलाच करत इच्छित जागी पोचण्याची यशस्वीता, याची गोष्ट रंजक आहे. एका ‘झेपेत’ तेरा हजार किलोमीटर एवढं अंतर सहजतेने कापणाऱया पक्ष्यांसाठी ते ‘सहज’ असतं का? त्यासाठी ते कोणती उड्डाण-साधना करतात? श्वसनावर कसं नियंत्रण ठेवतात. वाटेत पुठेही न थांबता, न खाता-पिता त्यांचा प्रवास कसा होतो? या सर्व गोष्टींचा आता बऱयापैकी अभ्यास झाला असून पक्षीतज्ञ सतत त्यांचं निरीक्षण करत असतात. त्यांच्या पायात हलक्या वजनाचे ‘टॅग’ अडकवून त्यांचा ठावठिकाणा नोंदला जातो. बार्ड टेल्ड गॉडविट या दूरस्थ झेप घेणाऱया पक्ष्याचा टॅग क्रमांक 234684 आहे. त्यावरून त्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळते.
असे पक्षी ऊर्जा साठवून कसे काय उड्डाण करतात, याचे काही निकषही जाणून घेण्यासारखे आहेत. अशा दूर उडणाऱया पक्ष्यांची हाडं काहीशी पोकळ असल्याने त्यांचं वजन उपजतच कमी असतं. त्यामुळे ते काही ग्रॅममध्ये मोजता येतं. माणूस किंवा इतर प्राण्यांची हाडं पोकळ किंवा ठिसूळ झाली तर तो ‘ऑस्टिओपोरोसिस’सारखा विकार मानला जातो. परंतु हाडाचं ‘जडत्व’ घेऊन ‘उडणं’ कठीणच. त्यासाठी आपण विमान शोधलंय.
या उड्डाणवारी करणाऱ्या पक्ष्यांचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे स्नायू खूपच बळकट असतात. आपण पोहताना पाण्यात तासभर हातपाय मारले तर ते ‘भरून’ येतात पिंवा उंच डोंगर चढाई करताना स्नायू ‘आंबतात.’ पक्ष्यांच्या मजबूत स्नायूंमुळे सलग 11 ते 12 दिवस पंखांची उघडझाप (फडफड) करत 13 हजार किलो मीटरचा पल्ला गाठला जातो, यावरून त्यांच्या पंखांच्या स्नायूंची शक्ती किती असेल याची कल्पना करा.
नकोसा पिसाराही असे पक्षी कमी करूनच उडतात असं म्हटलं जातं. श्वसनावर त्यांचा विलक्षण ताबा असतो. उड्डाणाची पूर्वतयारी तेही करतात. त्यामध्ये अन्न म्हणून शरीराला अनेक दिवस ऊर्जा देईल असा चरबीचा (फॅट) साठा महत्त्वाचा असतो. या प्राणीजगतात अशा अनेक रंजक गोष्टी आहेत. वाळवंटात मिळेल तिथे पाणी पिऊन उंट त्याचा ‘साठा’ शरीरात करून ठेवू शकतो. कांगारूला पिल्लू ठेवण्यासाठी नैसर्गिक ‘पिशवी’ पिंवा ‘पाऊच’ असतो.
दीर्घोड्डाण करणारे पक्षीही आवश्यक तेवढीच चरबी शरीरात साठवतात. माणसासारखं खा खा खाऊन ‘ओबेस’ (लठ्ठ) होण्याचे आजार, त्यांना त्यांचं उपजत शहाणपण, होऊच देत नाही. त्यामुळे हे काटक पक्षी ‘झेप’ घ्यायला सज्ज होतात. यातल्या 15 ग्रॅम वजनाच्या ‘लिटिल स्टिंट’ची तर कमालच आहे. स्वसंरक्षणासाठी त्यांना ‘समूहशक्ती’चं महत्त्व समजतं. म्हणून ते थव्याने उडतात. त्यातही त्यांच्या जन्मजात सुज्ञपणाच्या अनेक गोष्टी दिसून येतात. वाऱयाची दिशा आणि त्यातील उष्णतेचे झोत (करन्ट) त्यांना बरोबर समजतात. दिशा समजण्यासाठी त्यांच्या जैविक रचनेतच ‘कंपास’ असावा, तसे ते दिवसा सूर्य आणि रात्री ठळक ताऱयांचा मागोवा घेत उडत राहतात. या न्यायाने ते पहिले ‘खगोल अभ्यासक’ म्हणायला हवेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते इंग्लिश `v’ आकारात उडतात. चर्चिलने ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ ही दोन बोटांची खूण लोकप्रिय करण्यापूर्वी लाखो वर्षे पक्ष्यांना ‘न्’चं महत्त्व समजलंय. हे अक्षर अस्तित्वातही नव्हतं तेव्हापासून ते या आकारात उडण्याचं कारण, पुढच्या पक्ष्याच्या पंख फडफडीने हवेत निर्माण झालेली क्षणिक पोकळी मागच्याला उपयोगी पडते. 25 पक्ष्यांच्या ‘व्ही’ आकाराच्या थव्यात एक लीडर आणि अकरा-अकरा जणांचे दोन गट असं दिसतं. त्यातला गटप्रमुख वारंवार बदलत असतो. अशा उड्डाणाचा आणखी फायदा म्हणजे सर्व पक्षी परस्परांच्या नजरेच्या टप्प्यात असल्याने लांबलचक मार्गातही चुकामूक होत नाही. शिवाय या प्रकारच्या उड्डाणाने त्यांची झेप-क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढते! अशी ही सामूहिक ‘एकत्वा’ची किमया.
कोण शिकवतं या पक्ष्यांना एवढा सुज्ञपणा? अर्थात निसर्ग! पण आपणही त्यांच्याकडून अनुकरणाने समूहशक्ती आणि ‘एकमेकांस सहाय्य करू’चे धडे गिरवू शकतो. जमेल माणसाला? असं जमलं तर प्रगतीची उत्तुंग भरारीही घेता येईल.