महाकुंभात भीषण आग, गीता प्रेसमधील अनेक तंबू जळून खाक

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभ मेळा परिसरात आग लागल्याची बातमी समोर येत आहे. येथील सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये ही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुमारे तासाभरात अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. आगीत 50 तंबू जळाले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

सेक्टर 19 आणि सेक्टर 5 च्या सीमेवरील ओल्ड जीटी रोड क्रॉसिंगजवळ ही भीषण आग लागली. सर्वातआधी विवेकानंद कॅम्पमध्ये आग लागली होती. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आधी वर्तवण्यात येत होती. नंतर सिलेंडर स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली. आगीमुळे अनेक तंबू पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही जखमी झाले नाही.