रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नर्सिंग होम, रूग्णालये आणि दवाखान्यांना त्यांचे दरपत्रक आणि रूग्णांची सनद दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात सर्व रूग्णालय आणि दवाखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. रुग्णालय तपासणी दरम्यान या त्रुटी आढळल्यास रूग्णालय नोंदणी रद्द करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
एखाद्या रूग्णालयात किंवा दवाखान्यात आलेल्या रूग्णाला आणि त्याच्या नातेवाईकाला त्या दवाखान्यात डॉक्टरची फी किती आहे? खाटांचे भाडे किती आहे? एखादी शस्त्रक्रिया केली तर किती खर्च आहे? याची माहिती सांगणारे दरपत्रक रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. हे दरपत्रक पाहून त्या रूग्णालयात उपचार करायचे की नाही हा निर्णय रूग्ण आणि त्याचे नातेवाईक घेऊ शकतात. रूग्णालयात रूग्णांचे हक्क आणि सनद लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून रूग्णाला त्या रूग्णालयात काय सुविधा मिळणार आहेत याची माहिती मिळू शकते.तसेच रुग्णालय तपासणी दरम्यान या त्रुटी आढळल्यास रूग्णालय नोंदणी रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिला आहे.