Wankhede Stadium 50 Years – सचिन तेंडुलकर येथेच होता बॉल बॉय, पतौडी खेळले शेवटचा सामना; वानखेडे स्टेडियमचं अर्धशतक

मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन केलं आहे. 23 जानेवारी 1975 रोजी या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजकडून 201 धावांनी पराभव झाला होता. ज्यामध्ये क्लाइव्ह लॉईडने नाबाद 242 धावा केल्या होत्या. 1975 मध्ये हिंदुस्थानी संघातून वगळण्यात आलेल्या मन्सूर अली खान पतौडी यांचा हा शेवटचा सामना होता. क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा सचिन तेंडुलकर हाही येथेच कधीकाळी बॉल बाय होता.

वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिय कार्यक्रमात एमसीए रविवारी कॉफी टेबल बुक आणि टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. याशिवाय हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडलेल्या मुंबईच्या सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. याआधी एमसीएने मुंबईच्या सर्व ग्राउंड्समनला सन्मानित केलं होतं.

वानखेडे स्टेडियमबद्दल बोलताना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले आहेत की, ”हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासातील सर्व महत्त्वाच्या घटना वानखेडे स्टेडियमवर घडल्या आहेत.” ते म्हणाले, “वानखेडे स्टेडियमचा इतिहास पाहिला तर, 1983 मध्ये जेव्हा हिंदुस्थानने विश्वचषक जिंकला तेव्हा टीम इंडिया आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथेच आली होती. 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जेव्हा हिंदुस्थानी संघाने T20 विश्वचषक जिंकला तेव्हा टीम इंडिया येथेच आली होती. 2011 मध्ये आम्ही वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक जिंकला होता.”

दरम्यान, 1974 साली बांधलेले वानखेडे स्टेडियम हे जगातील सर्वात प्रतिष्ठत क्रिकेट मैदानांपैकी एक असून हे स्टेडियम क्रिकेट इतिहासातील अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. सचिन तेंडुलकरच्या 2013 मधील शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासून हिंदुस्थानच्या ऐतिहासिक 2011 च्या वन डे विश्वचषक विजयापर्यंत हे मैदान असंख्य आठवणींचे घर आहे.