Saif Ali Khan Attack – पैसे ‘गुगल पे’ केले अन् लोकेशन सापडले; सैफच्या हल्लेखोराला पोलिसांनी ‘असं’ शोधले

सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 72 तासांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. ठाण्यातील सारवडवलीमधील हिरानंदानी लेबर कॅम्पमधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद (वय – 30) असे आरोपीचे नाव असून ‘गुगल पे’द्वारे केलेल्या एका ट्रान्झाक्शनमुळे पोलिसांनी त्याला शोधून काढले अशी माहिती समोर आली आहे.

आरोपी मूळचा बांगलादेशचा असून एका हॉटेलमध्ये तो हाऊसकिपींगचे काम करत होता. त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. सैफवर हल्ला करण्याआधी तो काय करत होता? हल्ल्यानंतर तो कुठे-कुठे गेला? हे देखील समोर आले आहे. सैफवर चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याने कपडे बदलले, दादरमध्ये हेडफोनही खरेदी केले. एवढेच नाहीतर सैफवर शस्त्रक्रिया सुरू असताना हल्लेखोर हॉटेलमध्ये आरामात नाश्ता झोडत होता, असेही समोर आले आहे. त्यानंतर पकडले जाण्याची भीतीने तो आपला ठावठिकाणा बदलत होता.

सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हल्ल्यानंतर त्याने कपडे बदलले होते. त्याचा फोनही बंद होता. त्यानंतर तो दादरला केला आणि त्याने फोन सुरू केला. एका हॉटेलमध्ये त्याने ‘गुगल पे’द्वारे पैसेही दिले. इथेच तो फसला आणि पोलिसांनी सापळा रचत त्याचा माग काढला. पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.

सैफचा हल्लेखोर मोहम्मद शहजाद हा दादरहून वरळीतील एका हॉटेलमध्ये गेला होता. पूर्वी तो त्याच हॉटेलमध्ये कामाला होता. त्या ठिकाणी त्याने आरामात नाश्ता केला. गुगल पेद्वारे पेमेंट केले आणि पुन्हा दादरला आला. दादरहून तो ठाण्याला गेला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Saif Ali Khan Attack – सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती

मुकादम ताब्यात

मोहम्मद शहजाद याला कामावर ठेवणाऱ्या मुकादमाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पांडे असे या मुकादमाचे नाव असून मोहम्मद शरजादकडे कोणतीही कागदपत्र नसताना त्याला कामावर कसे ठेवले हा प्रश्न उपस्थित होत आहे.