बांगलादेशहून येऊन आरोपी गुन्हा करतो हे केंद्र सरकारचे अपयश आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच देशात गेली 10 वर्ष भाजपचं सरकार असून पंतप्रधान मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मुळचा बांगलादेशचा असल्याचे समोर आले आहे. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ही गंभीर बाब आहे. आरोपी बांगलादेशी आहे. हा जर रोहिंग्या असेल तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणे गरजेचे आहे. जर बांगलादेशहून आलेला व्यक्ती इथे गुन्हा करत असेल तर हे केंद्र सरकारचे अपयश आहे. गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात भाजपचं सरकार आहे, आता तिसरी टर्म आहे. अशा प्रकारे दुसऱ्या देशातले लोक घुसखोरी करत असतील तर केंद्र सरकारची नेमकी जबाबदारी काय? ही बाब फार गंभीर असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर देणे गरजेचे आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.