कामाचा वाढता ताण, कामाच्या डेडलाईनचे टेन्शन, नोकरी सांभाळताना कुटुंबीयांना वेळ देता न येणे, लांबचा प्रवास, रहदारी, शिक्षणाचा अतिरिक्त ताण यासारख्या समस्यांमुळे पुणेकरांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. देशात सर्वाधिक मानसिक समस्यांचा सामना पुणेकरांना कारावा लागत असून यामध्ये 18 ते 25 या वयोगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याचे एका संस्थेच्या विश्लेषण अहवालातून समोर आले आहे.
ऐतिहासिक शहर, सायकलींचे शहर, सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक आहे. आर्थिक आणि औद्योगिक वाढीच्या दृष्टीने पुणे हे महत्त्वाचे शहर बनले आहे. मागील काही वर्षांमध्ये पुणे हे माहिती आणि तंत्रज्ञानाची नगरी म्हणजेच आयटी हब म्हणून उदयास आले आहे. विविध क्षेत्रात पुण्याचा लौकिक वाढत असताना दुसरीकडे पुण्याचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. स्वाईन फ्लू, कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू, झिकासारख्या आजारांचे पुणे हे हॉटस्पॉट बनले होते. त्यातच आता देशात सर्वाधिक पुणेकर मानसिक आरोग्याच्या विळख्यात अडकत असल्याचे समोर आले आहे.
मानसिक आरोग्य सेवा प्रदान करत असलेल्या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम्पॉवर संस्थेच्या हेल्पलाइन नंबरवर मानसिक आरोग्याचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण देशभरातून येणाऱ्या कॉल्समध्ये सर्वाधिक कॉल्स हे पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. पुण्यातून येणाऱ्या कॉल्समध्ये 57 टक्के पुरुष, तर 43 टक्के महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत पुण्यामध्ये चिंताग्रस्तांचे प्रमाण २६ टक्के असल्याचे आढळले, तर मानसिक आरोग्यावर मदतीसाठी पुण्यातून आलेल्या कॉल्समध्ये 51 टक्के प्रमाण हे 18 ते 25 वयोगटातील तरुणांचे असल्याचेही दिसून आले आहे.
मानसोपचार तज्ज्ञांद्वारे मोफत मार्गदर्शन
एम्पॉवर संस्थेच्या हेल्पलाइन नंबरवर मानसिक आरोग्याच्या समस्येवर मदत मागण्यासाठी देशभरातून कॉल्स असून मानसोपचार तज्ज्ञांद्वारे मोफत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. या हेल्पलाईनवर दर महिन्याला देशभरातून चार हजारांहून अधिक कॉल्स मदतीसाठी येत आहेत. त्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या कॉल्सची संख्या ९०० ते एक हजाराच्या घरात आहे. त्यात एकट्या पुण्यातून येणाऱ्या कॉल्सची संख्या सहाशेहून अधिक असल्याचे समोर आले आहे.
पुण्यामध्ये शिक्षणावर असलेला भर आणि अत्यंत स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. वाढलेली जागरूकता आणि मानसिक आरोग्याचे सुलभ स्रोत तरुणांसाठी महत्त्वाचे आहेत. वेळेत उपचार मिळाल्यास तरुणांचे मानसिक स्वास्थ्य सुधारू शकते.
– डॉ. स्नेहा आर्य, मानसोपचारतज्ज्ञ एम्पॉवर सेंटर