एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील एटीएम घेऊन लुटमार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात राजगड पोलिसांना यश आले. तीन आरोपी हे हरियाणा, उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या बँकेची तब्बल 147 एटीएम कार्ड, पन्नास हजारांची रोकड मिळून आली. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
समून रमजान (36, रा. पलवन, हरियाणा), नसरुद्दीन नन्ने खान (30, रा. चिटा, बुलंदशहर, उत्तर प्रदेश), बादशाह इस्लाम खान (24, रा. बुलंद शहर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, आदील सगीर खान (30, रा. बुलंदशहर, उत्तर प्रदेश) असे फरार झालेल्या साथीदाराचे नाव आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
संशयित सोनेरी रंगाची आणि दिल्ली पासिंग असलेली एक कार ही खेड शिवापूरमार्गे कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने खेड शिवापूर भागात सापळा रचून गाडी अडविली. त्यांच्याकडे चौकशी करीत असताना, एकजण पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, गाडीमध्ये तब्बल 147 एटीएम कार्ड मिळून आली. तसेच पन्नास हजारांची रोकडदेखील होती. त्यांच्याकडील तपासात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यादरम्यान भोर तालुक्यातील कोळवडे भागातील रहिवासी असलेल्या एकाने आपली लुटमार झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली.
शुक्रवारी खेड शिवापूर भागातील कोंढणपूर येथे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तिघांनी चाकूच्या धाकाने लुटले. एटीएम घेऊन आरोपींनी पन्नास हजार रुपये काढून चारचाकीतून पळ काढल्याचे या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना आरोपींची गाडी दाखवली असता, त्यांनी ती ओळखली. त्यानुसार पोलिसांनी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी पुण्यासह जिल्ह्यात आणखी कुठे गुन्हे केलेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, अजित पाटील, अंबादास बुरटे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीत गुन्हे
गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून, त्यांनी महाराष्ट्रासह बुलंदशहर, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्ये अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यांनी संगनमताने हे गुन्हे केले आहेत. त्यादृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे.