अंबाबाई मंदिरातील कामात हयगय चालणार नाही, जिल्हाधिकारी येडगे यांची तंबी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड व नगारखान्याची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच या कामांच्या दर्जात कोणतीही हयगय चालणार नसल्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी दिल्या. शिवाय दर आठवड्याला या कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

श्री अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरणाच्या कामांबाबत जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अभियंता सुयश पाटील, वास्तुविशारद, ठेकेदार चंदूलाल ओसवाल, दशरथ देसाई आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या श्रीअंबाबाई मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मंदिर परिसरात कामे सुरू असल्यामुळे दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये, यासाठी या परिसरात सुरू असणारा गरुड मंडप तसेच मणिकर्णिका कुंड व नगारखान्याच्या नूतनीकरणाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. नगारखाण्याचे व मणिकर्णिका कुंडाचे काम मार्चअखेर पूर्ण करा. तसेच गरुड मंडपाचे काम जूनअखेर पूर्ण झाले पाहिजे. ही कामे करताना कामांचा दर्जा चांगला राखला जाईल, याची दक्षता घ्यावी, नूतनीकरणाची सर्व कामे ठरलेल्या वेळेत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. वास्तुविशारदांनी वेळोवेळी मंदिर परिसराला भेट देऊन सुरू असणाऱ्या कामांची पाहणी करावी. तसेच झालेल्या कामाच्या प्रगतीची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी.

गरुड मंडपासाठी आवश्यक असणारे संपूर्ण लाकूड मंदिर समितीच्या प्रयत्नातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे गरुड मंडपाचे काम गतीने करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच झालेल्या कामांच्या आढाव्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दर आठवड्याला बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, देवस्थान समितीचे सचिव नाईकवाडे यांनीही कामाबाबत काही सूचना केल्या. कामाचे ठेकेदार ओसवाल यांनी कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देऊन मंदिर परिसरातील कामे जलदगतीने व चांगल्या दर्जाची करण्यात येतील, असे सांगितले.