हिंदुस्थानात सर्वात जास्त इंटरनेट वापरण्यामध्ये केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. गोवा दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. केरळ राज्यात 72 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात. गोव्यात 71 टक्के, तर महाराष्ट्रात 70 टक्के लोक इंटरनेट वापरत असल्याची माहिती इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि कांतारच्या रिपोर्टमधून उघड झाली आहे. हिंदुस्थानात सध्या इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 886 मिलियन आहे. ती लवकरच 90 कोटीपार म्हणजे 900 मिलियन होण्याची शक्यता आहे.
देशाच्या ग्रामीण भागातसुद्धा इंटरनेट युजर्सची संख्या वाढत आहे. एकूण इंटरनेट युजर्सची संख्या आता 55 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास सर्वच इंटरनेट युजर्संनी या ग्रोथमध्ये 98 टक्के लोकांनी हिंदुस्थानी भाषेच्या कंटेटचा वापर केला आहे. यामध्ये तामीळ, तेलुगू आणि मल्याळम सर्वात जास्त लोकप्रिय आहे. 10 पैकी 9 इंटरनेट युजर्स एम्बेडेड एआय कॅपिसिटीच्या अॅप्सचा वापर करत असल्याचेही या रिपोर्टमधून समोर आले आहे.
इंटरनेट वापरण्यात महिलाही पुढे
देशात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरत असल्याचे समोर आले आहे. इंटरनेट युजर्समध्ये 58 टक्के महिला असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. ओटीटी व्हिडीओ, म्युझिक स्ट्रिमिंग, ऑनलाईन कम्युनिकेशन आणि सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. इंटरनेट युजर्स दररोज सरासरी 90 मिनिटे इंटरनेटचा वापर करतात. ज्यात शहरी युजर्स 94 टक्के, तर ग्रामीण युजर्स 89 टक्के इंटरनेटचा वापर करतात.