वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला पर्यटकांची पसंती; वर्षभरात 24 लाख पर्यटकांनी दिली भेट, 9.49 कोटींचा महसूल जमा

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे मुंबईसह देशभरातील पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण बनले असून गेल्या वर्षभरात 24 लाख 17 हजार 357 पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 9 कोटी 49 लाख 35 हजार 513 रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

मुंबईसह देशविदेशातील पर्यटक शहरात आले की मोठय़ा उत्साहाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. शनिवार -रविवार व सुट्टीच्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी होते. गेल्या वर्षभरात पर्यटकांनी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देत मुंबईतील सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ असल्याचे दाखवून दिले आहे.

अडीच महिन्यांत दोन कोटी 50 लाखांचे उत्पन्न

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत 24 लाख 17 हजार 357 पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 9 कोटी 49 लाख 35 हजार 513 रुपयांचा महसूल जमा झाला. 1 जानेवारी ते 19 ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांच्या कालावधीत 17 लाख 51 हजार 927 पर्यटकांनी भेट दिली होती. त्यामुळे महापालिकेला तब्बल 6 कोटी 99 लाख 9 हजार 108 इतका महसूल मिळाला होता, मात्र 20 ऑक्टोबर 2024 पासून ते 31 डिसेंबर 2024 या अडीच महिन्यांच्या कालावधीत सहा लाख पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत 2 कोटी 50 लाख 26 हजार 405 रुपये एवढी वाढ झाली आहे.

पेंग्विनने मने जिंकली, वाढला महसूल

उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने सुरू आहे. गुलाब तसेच जपानी बगीचा बनवण्यात आला. मुलांसाठी मनोरंजन खेळणी, देशी व विदेशी पक्षी, वाघ, बिबटय़ा, सुसर असे विविध पक्षी, प्राणी राणीबागेत ठेवण्यात आले आहेत. दक्षिण कोरियातून 2016 साली आणलेल्या पेंग्विनमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पेंग्विनसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून पालिकेकडून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. पेंग्विन्सच्या गमतीजमतीने पाहणाऱयांची मने जिंकली असून त्यांना पाहण्याचा मोह मुलांसह मोठय़ांनाही होतो आहे. पेंग्विनमुळे पालिकेच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे.