म्हाडाच्या भूखंडावर होणारे अतिक्रमण वेळीच रोखता यावे यासाठी म्हाडाचे अधिकारी आता दर शुक्रवारी फिल्ड व्हिजीट करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या म्हाडाच्या बैठकीत उपाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दर शुक्रवारी फिल्ड व्हिजीट करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडाच्या जमिनीवरील वाढते अतिक्रमण ही प्राधिकरणासाठी डोकेदुखी ठरत आहे. ही अतिक्रमणे हटवून भूखंड ताब्यात घेताना मोठय़ा प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होतो. अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर भूखंडावर अतिक्रमण झाल्याचे म्हाडाच्या लक्षात येते. म्हाडाचे अधिकारी प्रत्यक्षात साईटवर फिरकत नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत म्हाडा उपाध्यक्षांनी आता अभियंत्यांना दर शुक्रवारी फिल्ड व्हिजीट करणे बंधनकारक केले आहे.
निर्माणाधीन बांधकामांचीही आढावा घेणार
‘सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकार करणारे प्राधिकरण’ अशी म्हाडाची ओळख आहे. आजवर म्हाडाच्या माध्यमातून नऊ लाखांहून अधिक जणांचे गृहस्वप्न साकार झाले आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या अनेक नव्या इमारतींचे बांधकाम सुरु आहे. या इमारतींच्या कामाकाजाची अपडेटदेखील फिल्ड व्हिजीटमुळे अधिकाऱ्यांना घेता येणार आहे.