महारेरा तुमच्या दारी! मुंबईसह आता नागपूर आणि पुण्यातदेखील घेणार विशेष खुले सत्र, गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीसाठी होणार मदत

नागपूर आणि पुणे भागातील विकासकांना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी करताना मदत व्हावी यासाठी एरव्ही मुंबई मुख्यालयातच होणारे खुले सत्र (ओपन हाऊस) या महिन्यापासून या दोन्ही ठिकाणी सुरू होणार आहे. यापैकी पहिले खुले सत्र बुधवार, 22 जानेवारीला नागपूर येथे होणार आहे. यात नवीन प्रकल्पांची नोंदणी करताना निर्माण होणाऱया अडचणींबाबत शंका समाधानासाठी महारेरा मुख्यालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची महारेराकडे नोंदणी करताना ते सदस्य असलेल्या स्वयंविनियामक संस्थांच्या तज्ञांची मदत होत असली तरी विकासकांना पुरेशा माहितीअभावी अडचणींना सामोरे जावे लागते. या शंका समाधानासाठी महारेराच्या मुख्यालयात दर आठवडय़ाला वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत खुले सत्र होते. त्यात संबंधितांचे प्रकरणपरत्वे शंका समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशा पद्धतीचे खुले सत्र नागपूर, पुणे येथे व्हावे अशी विकासकांची मागणी होती. म्हणून महारेराने नागपूर, पुणे येथे महिन्यातून एकदा पूर्वघोषित वेळापत्रकानुसार गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीशी संबंधित मुख्यालयातील न्यायिक, आर्थिक आणि तांत्रिक विभागांच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत खुले सत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे.

z मुंबई महाप्रदेशाबाहेरील विकासकांच्या अधिपृत संघटनांना स्वयंविनियामक संस्था स्थापन करता यावी म्हणून किमान 500 प्रकल्पांचा निकष 200 पर्यंत कमी करण्याचा निर्णय नुकताच महारेराने घेतला. उर्वरित महाराष्ट्रातील विकासकांना दिलासा देणारा महारेराचा हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय आहे.