मंत्रीपद डावलल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ यांनी आज शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिबिराला अवघी एक तास हजेरी लावली. यावेळी भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. ‘हे शिबीर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, कोणा एका व्यक्तीचे नाही, मात्र शिबिराचे नाव ‘अजितपर्व’ ठेवले आहे यावरून काय ते समजून घ्या. पक्षात आता एकाधिकारशाही दिसून येते,’ असा हल्लाबोल भुजबळ यांनी केला.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिराला आज सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी शिबिराला उपस्थित आहेत. छगन भुजबळ उपस्थित राहणार की नाही याची उत्सुकता होती. भुजबळ यांचे खास स्टाईलमध्ये शिर्डीत आगमन झाले. आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर शिबिराच्या ठिकाणी आले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले नाही. केवळ एक तास शिबीरस्थळी थांबले आणि थेट बाहेर पडले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
स्पष्ट बोलतो म्हणून शिक्षा मिळाली
माझी कोणावरही नाराजी नाही हे सांगतानाच भुजबळ यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. हे शिबीर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. कोणा एका व्यक्तीचे नाही, मात्र शिबिराचे नावच ‘अजितपर्व’ ठेवले आहे. यावरून काय ते समजून घ्या. पक्षात आता एकाधिकारशाही दिसून येते, असे भुजबळ म्हणाले. मी शरद पवारांच्या पक्षातही होतो. तिथे सगळय़ांचे विचार जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतले जायचे, मात्र आमच्या पक्षात कुणाचाच विचार जाणून घेतला जात नाही. मी नेहमी स्पष्ट बोलतो आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेल, तटकरेंच्या विनंतीमुळे हजेरी लावली
खासदार प्रफुल्ल पटेल काल दोन तास माझ्याकडे येऊन बसले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही फोन करून येण्याची विनंती केली. त्यामुळे मी शिबिराला हजेरी लावली, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
धनंजय मुंडे गैरहजर
बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेला मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र होत आहे. त्यामुळे पक्षाच्या शिबिराला धनंजय मुंडे यांनी दांडी मारली. मुंडेंच्या गैरहजेरीची चर्चा शिबिराच्या ठिकाणी सुरू होती.