नांदूरघाटच्या तिरंगा धाब्यावर शिजला संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट!

अवादा पंपनीकडे मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला आडवे येत असल्याने संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट शिजला नांदूरघाटच्या तिरंगा धाब्यावर! आठ डिसेंबरला धाब्यावर चिकनवर ताव मारीत संतोषला कसे संपवायचे याचा दुष्ट मनसुबा रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अमानुष हत्या झाली. या हत्येचा कट रचण्यासाठी काही आरोपी मस्साजोगपासून जवळच असलेल्या नांदूरघाटच्या तिरंगा धाब्यावर आठ डिसेंबरला जमले होते. चिकनहंडीची ऑर्डर देण्यात आली. मसालेदार चिकनवर ताव मारत संतोष देशमुखांना कसे संपवायचे याची आखणी करण्यात आली. आरोपींच्या चौकशीत या कटाचा खुलासा झाला. त्यानंतर सीआयडीचे पथक तिरंगा धाब्यावर चौकशीसाठी आले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. मात्र 20 दिवसांपर्यंतच फुटेज सुरक्षित राहत असल्याचे धाबामालकाने सांगितले. धाब्याच्या मालकाकडे चौकशी केली असता त्याने रोज शेकडो लोक जेवायला येतात. आठ डिसेंबरला नक्की कोण आले हे सांगता येणार नाही असे सांगितले.

आरोपींना न्यायालयीन कोठडी, वाल्मीकच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘मकोका’खाली अटकेत असलेले  सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना आज 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. विष्णू चाटे सध्या लातूरच्या कारागृहात असून सुधीर सांगळे, सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथे पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. दरम्यान, वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी आज टळली. ही सुनावणी आता 20 जानेवारीला होणार आहे.