पोलिसाने तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याने उच्च न्यायालय संतप्त झाले. याबाबत कारवाईसाठी काय पावले उचलली गेली आहेत याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने डीसीपींना दिले आहेत.
या महिलेच्या मुलीच्या घरी चोरी झाली आहे. याचा तपास योग्य होत नाही. याचा गुन्हा नोंदवला जात नाही, असा या महिलेचा आरोप आहे. तसे पत्र महिलेने पोलीस आयुक्तांना लिहिले. त्यानंतर तपासासाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. योग्य तपासासाठी महिलेने न्यायालयाचे दार ठोठावले.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर महिलेच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. समता नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे गेल्या सुनावणीत महिलेने न्यायालयाला सांगितले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने या अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश डीसीपी यांना दिले होते. यावरील पुढील सुनावणीत कारवाईची माहिती सादर झाली नाही. खंडपीठाने यासाठी अजून दोन आठवडय़ांची मुदत डीसीपी यांना दिली आहे.