कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण, संजय रॉय दोषी; फाशी की जन्मठेप? सोमवारी सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार

देशभर संताप व्यक्त झालेल्या कोलकातातील आरजी कर बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला तेथील सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. रॉयला फाशी की जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी यावर येत्या सोमवारी, 20 जानेवारी रोजी युक्तिवाद होईल. त्यानंतर न्यायालय निकाल जाहीर करेल. रॉयला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआयकडून केली जाणार आहे.

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येसाठी आरोपी रॉयला दोषी धरले जात आहे, असे सत्र न्यायाधीश अनिरबन दास यांनी शनिवारी स्पष्ट केले. न्यायालयीन पुढील प्रक्रियेनुसार सोमवारी सरकारी पक्ष व आरोपी रॉय शिक्षेसंदर्भात आपली बाजू मांडेल. उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर रॉयच्या शिक्षेचा निकाल न्यायालय देईल.

फॉरेंसिक रिपोर्टडीएनएने फास आवळला

फॉरेंसिक रिपोर्टनुसार रॉयची या प्रकरणातील सहभाग स्पष्ट होत आहे. घटनेच्या ठिकाणी व पीडितेच्या शरीरावर रॉयचे डीएनए सापडले आहेत. सरकारी पक्षाचे हे पुरावे निसंदेह असून ते ग्राह्य धरले जात आहेत, असे न्यायालयाने रॉयला दोषी जाहीर करताना नमूद केले.

57 दिवस चालला इन-कॅमेरा खटला

या खटल्याचे कामकाज तब्बल 57 दिवसांत पूर्ण झाले. याची सुनावणी इन-कॅमेरा झाली. सुरुवातीला या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत होते. नंतर सीबीआयकडे याचा तपास वर्ग करण्यात आला. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2024 रोजी याची सुनावणी सुरू झाली. 9 जानेवारी 2025 रोजी साक्षी पुरावे नोंदवण्याचे काम पूर्ण झाले.

निर्दोष असल्याचा दावा

मी निर्दोष आहे. मला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे, असा दावा रॉयने केला आहे.

देशभर उडाली होती खळबळ

गेल्या वर्षी 9 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडली. 10 ऑगस्टला रॉयला अटक झाली. कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय निवासी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला. याने देशभर एकच खळबळ उडाली. हॉस्पिटल प्रशासनाने सुरुवातीला  बलात्काराची शक्यता नाकारली. शवविच्छेदनात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.