दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शनिवारी भयंकर घटना घडली. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर भाजप समर्थकांनी दगड आणि विटांचा अंदाधुंद मारा करत हल्ला चढवला. या घटनेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आपचे नेते थोडक्यात बचावले.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल हे प्रचारासाठी गेले होते. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. भाजप समर्थक एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओही ‘आप’ने ‘एक्स’वर शेअर केला आहे. ‘दिल्ली निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप घाबरला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचार करू नये म्हणून त्यांना जखमी करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा गंभीर आरोप आपने केला आहे.
- केजरीवाल यांनी प्रचार करू नये म्हणून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपच्या लोकांनो, केजरीवाल अशा भ्याड हल्ल्याला घाबरत नाहीत, दिल्लीची जनता तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
- भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी ‘आप’ने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. केजरीवाल यांच्या गाडीने भाजपच्या दोन समर्थकांना धडक दिली. त्यामध्ये एका कार्यकर्त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर त्या दोन कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केजरीवाल हे लोकांच्या जिवाचे मोल विसरले आहेत, असे वर्मा म्हणाले.
याआधी तीनवेळा हल्ल्याचा प्रयत्न
याआधी विकासपुरीमध्येदेखील केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला होता. बुराडीमध्येदेखील केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला होता. 30 नोव्हेंबर 2024 रोजी दिल्लीतल्या मालवीय नगर परिसरात केजरीवाल यांची पदयात्रा चालू असताना एका व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था भेदत केजरीवालांच्या जवळ जाऊन त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ (स्पिरीट) फेकले होते.