वादग्रस्त वक्तव्य करणारे न्यायमूर्ती शेखर यादव अडचणीत! वरिष्ठ वकिलांनी लिहिले सरन्यायाधीशांना पत्र

समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ बोलताना वादग्रस्त वक्तव्य करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव हे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या 13 वरिष्ठ वकिलांनी शुक्रवारी 17 जानेवारीला न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याविरोधात सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना पत्र लिहिले आहे. न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याविरोधात CBI ला FIR दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

अलाहाबादमध्ये गेल्या महिन्यात 8 डिसेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कायदेविषयक शाखेने अलाहाबाद उच्च न्यायालयात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात न्यायमूर्ती शेख यादव यांनी आपल्या भाषणात अनेक टिप्पणी केल्या ज्या घटनाविरोधी आहेत. एका न्यायमूर्तीने घेतलेल्या शपथेच्या बरोबर उलट आहे.

आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी ‘आपली गीता आणि ‘तुमचं कुराण’ असा उल्लेख त्यांनी केला आहे. यात न्यायमूर्ती उघडपणे स्वतःला एका धर्माशी जोडत आहेत. तर दुसऱ्या धर्माचा अतिशय अपमान करताना दिसत आहेत. मुस्लिमांचा संदर्भ देताना त्यांनी जो शब्द वापरला तो अतिशय अपमान करणारा आणि चिंता वाढवणार आहे, असे वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिल्या पत्रात म्हटले आहे.

काय म्हणाले शेखर यादव?

तुमच्या मनात हा गैरसमज आहे की जर समान नागरी कायदा अस्तित्वात आला तर तो तुमच्या शरियतविरोधी, इस्लामविरोधी आणि कुराणविरोधी असेल. तुमचा पर्सनल लॉ असो किंवा आमचे हिंदू कायदे, तुमचे कुराण असो किंवा आमची भगवद्‌गीता, मी म्हणालो त्यानुसार आम्ही आमच्या चालीरीतींमधील अनेक चुकीच्या गोष्टींचे निराकरण केले आहे. मग तुम्हाला या कायद्याच्या अंमलबजावणीवर काय हरकत आहे? तुमची पहिली पत्नी असताना तुम्ही तीन विवाह करू शकता, तेही पहिल्या पत्नीच्या सहमतीशिवाय हे अस्वीकार्य आहे, असे न्यायमूर्ती शेकर यादव म्हणाले होते.