Champions Trophy 2025 India Squad – चॅम्पियन ट्रॉफीसाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर, रोहित कर्णधार, गिल उपकर्णधार

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ जग जिंकायला मैदानात उतरणार असून शुभमन गिल उपकर्णधार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचीही संघात निवड करण्यात आली आहे. मात्र तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे.

यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. पाकिस्तान आणि दुबईत याचे सामने होतील. पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये कराचीत होईल, तर हिंदुस्थानचा संघ 20 फेब्रुवारीला आपला पहिला सामना बांगलादेशशी खेळणार आहे.

या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत 12 जानेवारीपर्यंत होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे अतिरिक्त वेळेची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत बीसीसीआय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी संघाची घोषणा केली.

शमी, कुलदीपचे कमबॅक

मोहम्मद सिराज याला संघात स्थान देण्यात आलेले नाही, तर जायबंदी असतानाही जसप्रीत बुमराह याची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 14 महिन्यांनी आणि स्पिनर कुलदीप यादव याने दुखापतीनंतर कमबॅक केले आहे.

यशस्वी पहिल्यांदाच वन डे संघात

मुंबईचा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल याची पहिल्यांदाच वन डे संघात निवड झाली आहे. यशस्वीने याआधी 23 टी-20 आणि 19 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर 2500 हून अधिक धावांची नोंद आहे.

नायरला संधी नाही

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या करुण नायर याच्या नावाचा विचार होईल अशी शक्यता होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याने विजय हजारे ट्रॉफीत धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. तरीही त्याला संधी न मिळाल्याने याबाबत क्रीडाजगतातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Karun Nair – नायर नहीं, फायर…विजय हजारे ट्रॉफी’त पाडला धावांचा पाऊस

हिंदुस्थानचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा.

रिझर्व्ह खेळाडू – हर्षित राणा