>> आशा कबरे-मटाले
एल अँड टीच्या प्रमुखांच्या ‘त्या’ वक्तव्याची सगळीकडे तुफान टिंगलटवाळी झाली. त्यावरून असंख्य मीम्स, विनोद, कोटय़ा प्रचंड व्हायरल झाल्या. लोकांनी त्या वक्तव्यावर भरपूर तोंडसुख घेतलं. संस्था, संघटनांनी निषेध केला. का बरं ते सगळ्यांना इतकं खटकलं?
मागच्या वर्षी एका आईच्या पत्राने देशातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्या अवघ्या 26 वर्षांच्या मुलीच्या अकाली मृत्यूने व्यथित झालेल्या त्या आईने तिच्या कंपनीच्या प्रमुखांना हे पत्र लिहिले होते. तुमच्या कंपनीतील अतिकामाच्या ताणाने माझ्या मुलीचा बळी घेतला असा आरोप तिने पत्राद्वारे केला होता. 2023 मध्ये ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मार्च 2024 मध्ये अर्न्स्ट अँड यंग, पुणे या कंपनीने अॅना सेबॅस्टिअन पेरायिल हिची एक्झिक्युटिव्ह म्हणून नियुक्ती केली, पण अवघ्या चार महिन्यांत 20 जुलै रोजी तिचा अकस्मात मृत्यू झाला. ती रुजू झाली तेव्हाच अतिकामामुळे अनेक जण ती कंपनी सोडून जात होते, पण तू आपल्या कामातून टीमविषयीचा हा समज चुकीचा ठरव असे तिला सांगत तिच्या मॅनेजरने तिला कामाचा ताण सोसण्यास उद्युक्त केले. पहिल्याच नोकरीत स्वतःला सिद्ध करण्याच्या भरात ती सगळा ताण सोसत राहिली, पण अल्पावधीतच तिला अँक्झायटी, निद्रानाश आणि अतिताणाचा त्रास जाणवू लागला. रात्रभर जागून आणि आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवशीही ती काम करत राहिली. ‘कंपनीने अतिकामाचा उदोउदो करत कर्मचाऱयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या मुलीच्या मृत्यूने तरी तुम्हाला जाग यावी,’ असे त्या आईने पत्रात म्हटले.
त्या पत्राने एकंदरच कॉर्पोरेट क्षेत्रात सध्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामामुळे येत असलेल्या पराकोटीच्या ताणाकडे लक्ष वेधलं. विशेषतः तरुण कर्मचाऱ्यांची तिथे मोठी पिळवणूक होते हे सर्वज्ञात आहे. कॉर्पोरेट जगतात पगाराचे आकडे भले मोठाले असतील, पण बदल्यात टाकला जाणारा कामाचा भार अनेकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे मोठे नुकसान करतो. त्या पत्राने सुरू झालेली यासंदर्भातली चर्चाही काही दिवसांपुरतीच ठरली.
त्या पत्राची आता पुन्हा आठवण येण्याचे कारण म्हणजे गेला आठवडाभर देशातील माध्यमे आणि समाजमाध्यमांवर तुफान गाजलेले ‘एल अँड टी’च्या प्रमुखांचे आठवडय़ाला 90 तास काम करण्यासंदर्भातले वक्तव्य. काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तीही 70 तास कामाविषयी बोलले होते. तेव्हा त्यांच्या वक्तव्याचीही खिल्लीच उडवली गेली, पण एल अँड टीचे सीईओ सुब्रह्मण्यम यांनी त्याच्याही पुढे जात कहर केला. “मी तुम्हाला रविवारी कामावर बोलावू शकत नाही याचं मला वाईट वाटतं. जर मी तुम्हाला रविवारी कामावर आणू शकलो तर मला आनंद होईल. कारण मी रविवारीही काम करतो.’’ एवढं म्हणून ते थांबले नाहीत, तर “रविवारी घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता आणि बायकाही त्यांच्या पतीकडे किती वेळ पाहू शकतात? त्यापेक्षा ऑफिसला या आणि काम करा.’’ अशा आशयाचं विधान त्यांनी कर्मचाऱयांसमोर केलं. सोबतच त्यांनी चिनी कार्यनीतीचं कौतुकही केलं. चिनी लोक आठवडय़ाला 90 तास काम करतात, तर अमेरिकन्स फक्त 50 तास. या कामाच्या जोरावर चीन अमेरिकेला मागे टाकू शकेल असं आपल्याला एका चिनी माणसाने सांगितल्याचा किस्साही त्यांनी ऐकवला.
वास्तविक जगातील अनेक प्रगत देशांमध्ये 40 तासांपेक्षा कमी तास काम केलं जातं. सुब्रह्मण्यम यांच्यावर या आकडेवारीच्या आधारे चिक्कार टीका झाली. जपानसारखा कामावर निष्ठा असणारा देशही आता टोकियोत 4 दिवसांच्या आठवडय़ाचा प्रयोग करणार आहे. फ्रान्समध्ये 35 तास कामाचा कायदा आहे. डेन्मार्कसारखा देश ‘वर्क-लाइफ’ बॅलन्ससाठी कौतुकास पात्र ठरतो आहे, तर पाकिस्तान व बांगलादेशसारख्या देशांमध्ये मात्र कामाचे तास खूप अधिक आहेत! ग्लोबल वर्क-लाइफ बॅलन्स इंडेक्समध्ये 2024 साली भारत 48 व्या क्रमांकावर होता. जर्मनीसारखे प्रगत देश कर्मचाऱयांच्या विश्रांतीला व वैयक्तिक आयुष्याला महत्त्व देताना दिसतात. मग सुब्रह्मण्यम यांच्यासारख्या एका नामांकित कंपनीच्या प्रमुखांना 90 तासांचं खूळ कुठून सुचतं? दिवसाचे अफाट तास आपण काम करतो अशा बढाया मारणारे कुणी न कुणी अधूनमधून चर्चेत येतात, पण खरंच कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं जावं की, कामाच्या तासांचं कौतुक व्हावं? इतकी साधीसरळ गोष्ट एखाद्या उच्चविद्याविभूषित, जगभर हिंडणाऱया उच्चपदस्थाच्या ध्यानी येऊ नये? जगण्यात समतोल नको? व्यावसायिक आयुष्य महत्त्वाचं असतंच. त्यातून निव्वळ पैसा मिळत नाही, तर अनेकांसाठी काम ही त्यांची ओळख असते. अपार समाधान, आनंद त्यातून मिळतो. जगण्यातील अनेक बाबी हा पैसा व या व्यक्तिगत समाधानावर अवलंबून असतात, पण किमान शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्याइतपत विश्रांतीसाठी तरी कामाव्यतिरिक्त वेळ मिळायला नको का? अलीकडे ‘फोकस्ड‘ असण्याचा बराच बोलबाला आहे, पण फोकस्ड असणं म्हणजे झापडं लावल्यासारखं एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून जगणं असा अर्थ होतो का? करीअर आणि पैसा याच्यावरच लक्ष केंद्रित करून धावत राहिलेली मंडळी कालांतराने जगण्याचा अर्थ शोधू लागतात. मग या बाबाच्या, त्या गुरूच्या समोर अजाण बालकाच्या चेहऱयाने बसून, तो सांगेल त्यावर माना डोलावतात. नात्यागोत्यांचा गुंता, त्याच्याशी संबंधित समस्या या तर अवतीभवती वाढताना दिसत आहेतच. सीईओ महाशयांनी तुम्ही जोडीदाराकडे किती वेळ पाहत बसणार, असा प्रश्न करून नातेसंबंधांना ते किती क्षुद्र लेखतात हे दाखवून दिलंच आहे. कशातून तयार होत असावी अशी विचारसरणी? आज मध्यमवर्गीय घरातही मुलांना ‘फोकस्ड‘ असण्याचं बाळकडू दिलं जातं. तुला आयुष्यात मोठ्ठं व्हायचंय ना? मग पियानो शिकायचा, कराटेही शिकायचं, एखाद्या खेळाचं कोचिंगही. सारं-सारं ‘मोठ्ठं’ कुणीतरी बनण्याच्या प्रोजेक्टचा भाग! ध्येय निश्चित करून मेहनत करण्यात गैर काही नाही, पण त्या वाटचालीत बाकीचं काही दिसूच नये हे बरोबर कसं म्हणता येईल? नैराश्य, मानसिक ताणतणाव, आत्महत्या यांचं प्रमाण आपल्याकडे वाढताना दिसतंय. जगभर अस्थिरता, नैसर्गिक आपत्ती यांचं प्रमाण वाढतंय. आयुष्याच्या क्षणभंगुरतेचं दर्शन अधूनमधून घडत राहतं. खरं तर जगण्याचा अर्थ भारतीय तत्त्वज्ञानात, संतांच्या रचनांमध्ये साधासोपा करून सांगितलेला आहे. किमान काही भारतीयांपर्यंत तरी जगण्याची ही शहाणीव आजही पोहोचते आहे. म्हणूनच बहुधा 70 किंवा 90 तासांच्या कामाच्या अपेक्षांना आपण केराची टोपली दाखवू शकतो आहोत.