Mahakumbh Mela 2025 – महाकुंभमधील ‘गोल्डन बाबा’ चर्चेत; रुद्राक्ष माळ, अंगठ्यांसह जवळपास 7 किलो सोन्याचे दागिने अंगावर

उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यातील आयआयटीएयन बाबा, साध्वी हर्षा रिछारिया यांची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. अशातच आता महाकुंभ मेळ्यातील ‘गोल्डन बाबा’ही चर्चेत आले आहेत. या ‘गोल्डन बाबां’च्या अंगावर 6.8 किलो सोन्याची दागिने आहेत.

‘गोल्डन बाबा’ हे केरळमधील सनातन धर्म फाउंडेशनचे संस्थापक आणि चेअरमन आहेत. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर नारायणानंद गिरी महाराज असे त्यांचे नाव आहे. महाकुंभ मेळ्यात आलेल्या ‘गोल्डन बाबा’ यांनी स्वतः एएनआय या वृत्तसंस्थेला आपली माहिती दिली. माझं नाव श्री श्री 1008 अनंत श्री विभुषित स्वामी नारायण नंदगिरी महाराज असं आहे. मी केरळचा आहे. आणि मी सनातन धर्म फाउंडेशनचा चेरमन आणि निरंजनी आखाड्याचा महामंडलेश्वर आहे, असे ते म्हणाले.

संपूर्ण सोन्याची रुद्राक्ष माळ, सोन्याने मडलेली रुद्राक्षाची माळ, आखाड्याचे देवता मुरुगन, भद्रकाली, नटराज असे विविध प्रकारचे दागिने त्यांनी घातलेले आहेत. तर अंगठीत नरसिंह, भद्रकाली, मौल्यवान खडे आहेत. नंदी, मोर आणि गरुड अशी सोन्याची दागिने आहेत. एकूण 6 किलो 800 ग्रॅम सोने आहे. 15 वर्षांपासून मी येतोय. माझ्या वडिलांनी सर्वप्रथम मला रुद्राक्षाची सोन्याची माळ दिली. ही माळ 200 वर्षे जुनी असून वडिलांच्या निधनानंतर रुद्राक्षीची माळ परंपरेनुसार मला मिळाली, असे गोल्डन बाबा यांनी सांगितले.

सोन्याचे दागिने का घातले?

साधू, संत सोने, चांदी, संपत्तीपासून दूर असतात. साधे राहतात. मी असा नाही, माझे विचार काहीसे वेगळे आहेत. मला समाजाला यातून एक सकारात्मक संदेश द्यायचा आहे. मी फक्त शर्ट पँट घालून गेलो तर माझ्याकडे कोणीच येणार नाही? काहीतरी वेगळं आहे. देवाने मला एक संधी दिली आहे. देवाच्या इच्छेनुसार मी हे करतोय. या मागे समाजाचं भलं करण्याचा आपला उद्देश आहे, असे ‘गोल्डन बाबा’ म्हणाले.