तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले ‘दिल्लीतील साहित्यचिंतन’ हे पुस्तक सखोल चिंतन करून लिहिलेले आहे, असे जाणवते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या वैचारिक भूमिकेतून १९५४ साली दिल्लीत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज महाराष्ट्रासह देशामध्ये जाती-धर्मात माणूस विखुरला गेला आहे. या साहित्य संमेलनाद्वारे माणूस माणसाला जोडला जाईल, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनातील भाषणांचे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‘दिल्लीतील साहित्यचिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार अनंत गाडगीळ, अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, डॉ. शैलेश पगारिया उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी, श्रीराम पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. वंदना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. शैलेश पगारिया यांनी आभार मानले.