पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील एका शेतामधील मक्यच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने लघुशंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (16 रोजी) सायंकाळी घडली. दरम्यान, या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याच्या पथकांना आज यश आले.
शुक्रवारी सकाळी खडकवाडी येथील भातुंबरेवस्तीजवळील झुडपांमध्ये बिबट्या लपून बसला असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल शरद रहाणे यांना दिली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी रहाणे यांनी वन खात्याच्या जुन्नर व संगमनेर येथील पथकांना पाचारण केले. कर्मचाऱ्यांनी झुडपांभोवती जाळे पसरले. त्यावेळी जमलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने सैरभैर झालेला बिबट्या झुडपांमधून बाहेर येऊन पळू लागताच पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जाळ्यात जेरबंद केले. बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात येऊन पिंजऱ्यात डांबले. पाच ते सहा वर्षे वयाचा हा नर बिबट्या असून, त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला माळशेज घाटातील वनक्षेत्रात सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वन विभागाच्या टाकळी ढोकेश्वर येथील कार्यालयात बिबट्याच्या वावराबाबत वारंवार केलेल्या तक्रारींकडे, तसेच पिंजरा लावण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच खडकवाडी येथील घटना बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. वन खात्याच्या गलथान कारभारावर खडकवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती समजल्यानंतर खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते यांनी वनक्षेत्रपाल अनिल राहणे यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करून संबंधितांना भरपाई देण्याच्या सूचना दिल्या.
वन विभागाकडून आर्थिक मदत
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ईश्वरीच्या कुटुंबीयांना वन विभागाच्या वतीने १० लाखांची मदत तातडीने देण्यात आली. उर्वरित १५ लाख रुपये मुदत ठेवीच्या रूपाने बँकेत ठेवण्यात येणार असल्याचे सुजित झावरे, दीपक लंके यांनी सांगितले.