बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तालुक्यातील कौलगे येथील स्वप्नील अशोक पाटील (वय 27) या युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. तसेच गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत या खुनाचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या.
आशितोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील (वय 25, रा. कौलगे), सागर संभाजी चव्हाण (वय 30, रा. नानीबाई चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत स्वप्नीलचे वडील अशोक पाटील (वय 64) यांनी फिर्याद दिली.
स्वप्नील हा एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरीस होता. बुधवारी (15 रोजी) कामाला जाण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास तो घरातून गेला होता. शुक्रवारी सकाळपर्यंत तो घरी परतला नव्हता. दरम्यान, आज सकाळी अशोक पाटील यांना खडकेवाडा गावाच्या हद्दीतील सामाजिक वनीकरण परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
घटनेची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस ठाणे यांना तपास पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने वेगाने तपास करीत संबंधित दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनंतर रात्री त्याच्यावर कौलगे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक वर्षाने काढला काटा
एक वर्षापूर्वी स्वप्नीलने आशितोषच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. त्याचा राग मनात ठेवूनच आशितोषने मित्र सागर चव्हाण याच्या मदतीने स्वप्नीलला डोक्यात दगड घालून ठार मारले. त्याची ओळख पटू नये म्हणून दुचाकीमधील पेट्रोल ओतून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची कबुलीही आशितोष उर्फ छोट्या याने तपास पथकाला दिली.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, बालाजी पाटील, रोहित मर्दाने, विजय इंगळे, राजू कांबळे, समीर कांबळे, यशवंत कुंभार यांच्या पथकाने केली. मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे तपास करीत आहेत.