याचा अर्थ मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडेंना संरक्षण, आदित्य ठाकरे यांची टीका

वाल्मीक कराडवर अनेक आरोप होत आहेत, तर कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. पण असे असले तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही, याचा अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंडेंना संरक्षण आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच फडणवीसांनी भ्रष्ट नेत्यांना सरकारमध्ये घेतलं असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या शहरांत, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. अनेक केसेस तर बाहेर सुद्धा येत नाही. हिट अँड रनचं काय झालं? दोन तीन दिवस त्याच्या बातम्या आल्या पुढे काय झालं माहित नाही.

तसेच विरोधी पक्ष म्हणून आमची मोठी जबाबदारी आहे की राज्यात जे सुरू आहे ते सरकारपुढे आणलं पाहिजे. राज्यात तीन नेत्यांमध्ये तु तु मै मै सुरू आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांना कोण रोखतंय. त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का? काही युती धर्म आहे का? या मागे काय गुपित आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं. वाल्मीक कराडबद्दल माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत, पण धनंजय मुंडेंचा राजीनामा येत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांकडून त्यांना पूर्ण संरक्षण आहे. नवीन सरकार आलं तेव्हा आम्ही अपेक्षा केली की मुख्यमंत्री फडणवीस राज्याला चांगल्या मार्गावर नेतील, भ्रष्ट नेत्यांना बाजूला सारतील. पण असे होताना दिसत नाही, राज्याचा विश्वासघात होतोय असेही आदित्य ठाकरे म्हणाले.