>> मंगेश वरवडेकर
खो-खोत फक्त हिंदुस्थानचीच दादागिरी चालते आणि हिंदुस्थानच्या आक्रमणाचे कुणाकडेही प्रत्युत्तर नसल्यामुळे यजमानांच्या महिलांपाठोपाठ पुरुष संघानेही जगज्जेतेपदाच्या थाटात खो-खो वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. हिंदुस्थानी महिला संघाने आपला शतकी गुणांचा झंझावात चौथ्या सामन्यातही कायम राखत बांगलादेशी महिलांचा 109-16 असा 93 गुणांनी धुव्वा उडवला, तर पुरुष संघानेही स्पर्धेत प्रथमच गुणांचे शतक गाठताना श्रीलंकेचा 100-40 असा फडशा पाडला. आता उपांत्य फेरीत हिंदुस्थानी पुरुषांची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडेल, तर दुसरी उपांत्य लढत युगांडा आणि नेपाळ यांच्यात होईल. पुरुषांच्या गटातही हिंदुस्थानची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल, तर दुसरा उपांत्य सामना इराण-नेपाळ यांच्यात रंगेल.
आजही उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये हिंदुस्थानी संघांनी प्रतिस्पध्यर्थ्यांना अक्षरशः पळवून पळवून दमवले. दोन्ही संघांनी आपल्या आक्रमणाच्या खेळात 50 पेक्षा अधिक गुण मिळवत आपला शतकी विजय निश्चित केला होता. महिलांच्या सामन्यात कर्णधार प्रियांका इंगळेने आपला वेगवान खेळ कायम दाखवत विरोधी संघाला संरक्षण करण्याची एकही संधी मिळू दिली नाही. प्रियांकाच्या साथीने रेश्मा राठोड आणि नसरीन शेखनेही आक्रमणात गुणांचा सपाटा लावत मध्यंतराला 56-8 अशी विजयी आघाडी मिळवून दिली होती. स्पर्धेतील सारेच संघ हिंदुस्थानी संघाच्या तुलनेत कमकुवत असल्यामुळे प्रेक्षक सामन्याच्या प्रारंभापासूनच विजयी जल्लोष करायला प्रारंभ करायचे, तो जोश शेवटपर्यंत तसूभरही कमी होत नव्हता. हिंदुस्थानचा खेळ पाहून दोन्ही संघांसाठी जगज्जेतेपदाचा करंडक उंचावण्याची केवळ औपचारिकता उरली आहे, जी रविवारी पूर्णत्वास जाईल.
हिंदुस्थानच्या महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना हिंदुस्थानने 50 गुणांची कमाई केली. तर संरक्षणात 6 ड्रीम रान मिळवत मध्यंतराला 56-08 अशी मोठी आघाडी घेतली होती. तर मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत हिंदुस्थानने बांगलादेशचा 109-16 असा 93 गुणांनी पराभव केला.
पुरुषांचे पहिले शतक
हिंदुस्थानच्या पुरुषांनी महिला संघापासून प्रेरणा घेत आज प्रथमच आपल्या गुणांचेही शतक झळकावत आपला मोठा विजय नोंदवला. श्रीलंकेच्या खेळाडूंनी आपला क्षमतेपेक्षाही चांगला खेळ करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले; पण ते आपल्या गुणांची पन्नाशी गाठण्यात अपयशी ठरले. विशेष म्हणजे मध्यंतराला 58-18 अशी आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थान आपल्या दुसऱ्या आक्रमणात आपल्या गुणांचे पहिले शतक साजरे केले. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 22 गुण मिळवू शकला
इतर उपांत्यपूर्व फेरी निकाल –
महिला गट – युगांडाने न्यूझीलंडचा 71-26, दक्षिण आफ्रिकाने केनियाचा 51-46 आणि नेपाळने इराणचा 103-8 असा पराभव केला
पुरुष गट – इराणने केनियाला 86-18, दक्षिण आफ्रिकाने इंग्लंडला 58-38, नेपाळने बांगलादेशला 67-18 असे हरवले.