Karun Nair – नायर नहीं, फायर…विजय हजारे ट्रॉफी’त पाडला धावांचा पाऊस

क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या करुण नायरने ‘विजय हजारे ट्रॉफी’त धावांचा पाऊस पाडून ‘नायर नहीं, फायर हूं मैं…’ हे अवघ्या हिंदुस्थानला दाखवून दिले. ‘हजारे ट्रॉफी’त पाच शतकांच्या जोरावर 756 धावा कुटणाऱ्या नायरने हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे दार ठोठाविले असून, ‘देशासाठी खेळणे हे माझे नेहमीच स्वप्न आहे आणि ते अजून जिवंत आहे,’ असे भावना व्यक्त करीत निवड समितीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तब्बल आठ वर्षांपासून संघाच्या बाहेर असलेल्या करुणच्या नावाचा आगामी इंग्लंडविरुद्धची मालिका आणि ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेसाठी निवड समिती विचार करते का? याकडे क्रिकेटप्रेमींचा नजरा लागल्या आहेत.

फलंदाजीतून करुणच्या धावांची भूक वाढल्याचे स्पष्ट जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तो फलंदाजीमध्ये चमक दाखवतोय. देशासाठी खेळण्याचे माझे स्वप्न जिंवत असल्यामुळेच मी अद्यापि क्रिकेट खेळत आहे. देशासाठी खेळणे हे माझे एकमेव ध्येय असल्याचेही करुण नायर पुन्हा म्हणाला.

‘मला वाटतं, हे माझं तिसरं पुनरागमन असेल. हिंदुस्थानी संघात स्थान मिळविण्यासाठी मला माझ्या खेळामध्ये सातत्य टिकवावे लागेल. त्यासाठी मी धावा करीत राहीन. यापलीकडे माझ्या हातात काहीही नाही. पण जोपर्यंत निवड होत नाही, तोपर्यंत माझे स्वप्न जिवंत असेल. वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे माझ्या बॅटमधून धावा निघू लागल्या आहेत,’ असेही नायर म्हणाला.

‘माझं करीअर संपेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला फक्त विचार करायचा होता की, हे कुठे चाललंय? मी काय करत आहे? हे कसं घडलं? त्या टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं? हे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. मी स्वतःला सांगितलं की, मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या माझ्यासाठी हा कठीण काळ होता. या कठीण काळाने मला क्रिकेटबद्दल खूप काही शिकविल्याचेही त्याने बोलून दाखविले.