>> वर्षा चोपडे
पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनादरम्यान चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. ही ठिकाणे म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक जिथे कुंभमेळय़ाचे आयोजन केले जाते. यातीलच प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 ते महाशिवरात्र 26 फेब्रुवारी पर्यंत महाकुंभ मेळा संपन्न होत आहे.
प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून सुरू होणारा महाकुंभ मेळा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला संपेल. कुंभमेळ्यात नदीत स्नान केल्याने पापमुक्त होऊन जन्म-मृत्यूच्या फेऱयातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कुंभमेळय़ाचा इतिहास किमान 850 वर्षांचा आहे. आदिशंकराचार्यांनी याची सुरुवात केली होती असे मानले जाते, परंतु काही कथांनुसार कुंभाची सुरुवात प्राचीन काळापासून समुद्र मंथनापासून झाली होती. धर्मग्रंथात असे सांगितले आहे की, पृथ्वीवरील एक वर्ष हा देवांचा दिवस असतो, म्हणून दर बारा वर्षांनी पुन्हा एकाच ठिकाणी कुंभ आयोजित केला जातो. प्रयागराजमध्ये अनेक प्राचीन आणि पौराणिक मंदिरे आहेत त्यापैकी रामायणकालीन वेणी माधव मंदिर अंत्यत महत्त्वाचे मानले जाते.
प्रयागराज कुंभमेळय़ात हत्ती, घोडे आणि रथावरील आखाडय़ांची पारंपरिक मिरवणूक, भजन, शाही स्नान, नागा साधूंच्या मिरवणुका आणि इतर अनेक सांस्कृतिक उपक्रम पार पाडले जातात. या मेळाव्यात लाखो हिंदू यात्रेकरू सहभागी होतात. असे म्हणतात सृष्टीतील सगळय़ात प्रथम यज्ञ श्री ब्रह्माजीने याच ठिकाणी केला होता. प्रथममधील ‘प्र’ आणि ‘याग’ म्हणजे यज्ञ असे शब्द मिळून प्रयाग या शहराचे नाव पडले.
प्राचीन प्रयाग हे द्वीपकल्पात वसलेले शहर आहे, ज्याला तीन बाजूंनी गंगा आणि यमुना नद्यांनी वेढले आहे. इलाहाबाद किंवा अलाहाबाद म्हणूनही हे शहर ओळखले जाते. प्रयागराज कुंभमेळय़ात चार शाही स्नान होणार आहेत. ऋग्वेदानुसार सरस्वती नदी जी आता कोरडी पडली आहे, पण ती गंगा नदीखाली वाहते असे मानले जाते. 13 जानेवारी 2025 रोजी महाकुंभमेळय़ाचे पहिले शाही स्नान झाले. या मेळाव्यात प्रामुख्याने तपस्वी, संत, साधू, साध्वी आणि हिंदू समाजाच्या सर्व स्तरातील यात्रेकरू सहभागी होतात. हिंदू धर्मात कुंभमेळा म्हणजे 12 वर्षांच्या कालावधीत चार वेळा साजरी केली जाणारी धार्मिक परंपरा आहे.
कुंभमेळय़ाचे भौगोलिक स्थान हिंदुस्थानातील चार ठिकाणी असून उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे गंगेच्या काठावर, मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर साजरा होतो. जे साधना करतात आणि आध्यात्मिक शिस्तीचा कठोर मार्ग अवलंबतात ते साधू आणि नागा साधू यांचा यात विशेष सहभाग असतो. हरिद्वार आणि प्रयाग या दोन कुंभ उत्सवांमध्ये अर्ध कुंभ हा सहा वर्षांच्या अंतराने आयोजित केला जातो, म्हणून याला कुंभमेळय़ाचा मधला टप्पा म्हणून पाहिले जाते. 12 वर्षांतून एकदा पूर्ण कुंभ होतो. पूर्ण कुंभमेळा फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो. तथापि, पूर्ण कुंभला महाकुंभ असेही म्हणतात. प्रयागराजजवळ असलेले वाराणसी, अयोध्या धाम हेसुद्धा आकर्षणाची मुख्य धार्मिक स्थळं आहेत.
कुंभ उत्सवाच्या आयोजनाबाबत सर्वात प्रचलित कथा ही कुंभातून पडलेल्या समुद्र मंथनापासून प्राप्त झालेल्या अमृत थेंबाची आहे. कथा अशी आहे की, महर्षी दुर्वासाच्या शापामुळे जेव्हा इंद्र आणि इतर देव दुर्बल झाले तेव्हा राक्षसांनी देवांवर हल्ला करून त्यांचा पराभव केला. मग सर्व देव एकत्र भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना संपूर्ण कथा सांगितली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना राक्षसांसह दुधाचा सागर मंथन करून अमृत काढण्याचा सल्ला दिला. सर्व देवांनी दानवांशी तह करून अमृत काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अमृतकुंभ बाहेर पडताच भगवंतांच्या आज्ञेनुसार इंद्रपुत्र जयंत अमृत कलश घेऊन आकाशात झेपावला. त्यानंतर दानवांचे गुरू शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार ते अमृत परत घेण्यासाठी दानवांनी जयंतचा पाठलाग केला आणि खूप कष्टानंतर त्यांनी जयंतला मध्यभागी पकडले. त्यानंतर अमृत पात्रावर ताबा मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये बारा दिवस अखंड युद्ध झाले. या परस्पर संघर्षादरम्यान पृथ्वीवरील चार ठिकाणी (प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक) कलशातून अमृताचे थेंब पडले. त्यावेळी चंद्राने घटस्रावापासून घटाचे रक्षण केले, सूर्याने घट फुटण्यापासून, गुरूने राक्षसांच्या अपहरणापासून आणि शनीने देवेंद्राच्या भयापासून घटाचे रक्षण केले. कलह शांत करण्यासाठी देवाने मोहिनीचे रूप धारण केले आणि प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार अमृत वाटले. अशा प्रकारे देव आणि दानवांमधील युद्ध संपले. अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये बारा दिवस अखंड युद्ध झाले. देवांचे बारा दिवस माणसांच्या बारा वर्षांच्या बरोबरीचे असतात. त्यामुळे बारा कुंभदेखील आहेत. त्यापैकी चार कुंभ पृथ्वीवर आहेत आणि उरलेले आठ कुंभ देवांच्या जगात आहेत, तेथे फक्त देवच पोहोचू शकतात, मानवाला तिथे प्रवेश नाही असे म्हटले जाते. ज्या वेळी चंद्रादिकांनी कलशाचे रक्षण केले होते, तेव्हा त्या काळातील वर्तमान राशींचे रक्षण करणारे चंद्र-सौर ग्रह येतात, तेव्हा कुंभ राशीचा योग तयार होतो, म्हणजे ज्या वर्षी राशी सूर्य, चंद्र आणि गुरू यांच्याशी जुळतात. म्हणजे त्याच वर्षी त्याच राशीच्या संयोगात जिथे अमृताचा थेंब पडला होता तिथे कुंभोत्सव होतो.
हिंदुस्थान व जगभरातून कोटय़वधी भाविक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र नदीत स्नान करतात. इ.स. 2001 साली पार पडलेल्या महाकुंभमेळय़ात अधिकृत अंदाजानुसार 3 ते 7 कोटी भाविकांनी भाग घेतला होता.
राजा हर्षवर्धनच्या कारकीर्दीत (ए.डी. 607-647) भारतातून प्रवास करणारे चिनी बौद्ध भिक्षू आणि इतिहासकार, ह्युएन त्सांग यांनी हिंदुस्थानवरील आठवणींमध्ये लिहिले आहे की, त्यांनी इसवी सन 643 मध्ये प्रयागाला भेट दिल्याची नोंद आहे.
[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)