कंगनाच्या ‘इमर्जन्सी’विरोधात पंजाबात उद्रेक, शो बंद पाडले

खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या इमर्जन्सी या सिनेमाविरोधात आज पंजाबमध्ये उद्रेक झाला. आज प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि शीख संघटनांनी राज्यभरात सिनेमाविरोधात तीव्र निदर्शने केली. सिनेमातून शीख समुदायाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप शीख संघटनांनी केला आहे. दरम्यान, अशा प्रकारे शीख संघटनांकडून आंदोलन करून कला आणि कलाकारांचा नाहक छळ सुरू असल्याचा आरोप कंगना रनौत यांनी केला आहे.

शीख संघटनांनी राज्यभरातील विविध सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स आणि मॉलबाहेर सिनेमाविरोधात तीव्र निदर्शने केली. रनौत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती केली असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. 1975 ते 1977 या 21 महिन्यांचा काळ सिनेमात दाखवण्यात आला आहे. सिनेमाला सेन्सॉर प्रमाणपत्र देताना अनेक वादविवाद झाले. सिनेमातून शीख समुदायाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सिनेमाला विलंबाने प्रमाणपत्र मिळाले आणि आजपासून सिनेमा देशभरात प्रदर्शित करण्यात आला. पंजाबमध्ये लुधियाना, अमृतसर, पतियाला, होशियारपूर आणि बठिंडा येथे सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. विविध मॉल्स, सिनेमागृहांबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

अमृतसरमध्ये महिला आक्रमक

अमृतसरमध्ये आंदोलकांमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. सिनेमाचे प्रदर्शन बंद झालेच पाहिजे अशा घोषणांचे फलक आंदोलकांनी झळकावले. आम्ही सिनेमावर बंदी घालण्याबाबत केंद्र सरकार आणि पंजाब सरकारशी चर्चा केली. परंतु कुठल्याही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप शीख संघटनेचे नेते प्रताप सिंग यांनी केला.