लोअर परळमधील पदपथ, रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली

लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील पदपथ आणि रस्त्यावरील अनधिकृत शेड्स, दुकानांसमोरील वाढीव बांधकामांवर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. त्यामुळे या मार्गावरील पदपथ, रस्ता मोकळा झाला असून वाहनचालक आणि पादचाऱयांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या जी-दक्षिण विभाग हद्दीतील गणपतराव कदम मार्गावर व्यावसायिक, दुकानदार, गाळेधारकांनी वाढीव बांधकाम, अनधिकृत शेडस् उभारल्याचे मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या निदर्शनाला आले. अतिक्रमणामुळे पादचारी, वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. ही अतिक्रमणे हटवावीत, असे निर्देश उपायुक्त प्रशांत सपकाळे आणि जी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी दिले होते.