तब्बल 14 वर्षांनी सिंहाच्या गुहेत पाळणा हलला, बोरिवलीच्या नॅशनल पार्कात ‘मानसी’ने दिला गोंडस बछड्याला जन्म

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तब्बल 14 वर्षांनंतर सिंहाचा जन्म झाला असून ‘मानसी’ सिंहिणीने गोंडस बछडय़ाला जन्म दिला आहे. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नॅशनल पार्कमध्ये ही आनंदाची बातमी आली. जन्मलेल्या छाव्याचे वजन 1 किलो 300 ग्रॅम असून त्याची आणि आईचीही प्रकृती उत्तम असून दोघांनाही डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापना दिवशीच ही गोड बातमी आली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मानस आणि मानसी ही प्युअर एशियाटिक ब्रीड असलेली जोडी जुनागढवरून 2022 मध्ये आणली गेली. मात्र त्यांनी अद्याप छाव्याला जन्म दिला नव्हता. यातच गेल्या वर्षी मानसी सिंहीण आजारीही पडली होती. तब्बल 18 दिवस तिने काहीच खाल्ले नव्हते. त्यामुळे ती वाचणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र नॅशनल पार्कच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी मानसीची अहोरात्र शुश्रूषा करून तिला वाचवले. आजारातून पूर्ण बरी झाल्यानंतर 108 दिवसांचा गर्भारपणाचा कालावधी पूर्ण करीत तिने छाव्याला जन्म दिल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी दिली.

आशा आणि निराशेनंतर आनंदाचा क्षण!

सिंहाच्या जन्माचा प्रवास हा सोपा नव्हता. खूप आव्हानांचा, खाचखळग्यांचा होता. आशा आणि निराशेच्या सीमेवरचा होता. कारण मानसीचे आजारपण, रागीट मानस यामुळे त्यांचे मीलन घडवून आणणे आव्हानच होते. यातच बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्यानंतर जन्म होत नव्हता. त्यामुळे आपण वाघाईच्या देवळात जाऊन प्रार्थनाही केल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी सांगितले. आशा आणि निराशेनंतर आनंदाचा क्षण आल्याचे त्या म्हणाल्या.

सिंहाशी आधी खटके… नंतर सूर जुळले!

खरे तर सिंह मानसचे सुरुवातीपासूनच पटत नव्हते. मानस डरकाळी पह्डून त्वेषाने तिच्या अंगावर धावून जायचा. तिला ओरबाडायचा. परिणामी मानसी बिचारी नेहमी घाबरलेल्या अवस्थेत असायची. त्यामुळे त्या दोघांना एकत्र करणे सोपे नव्हते. मात्र नॅशनल पार्कचे डॉक्टर, कर्मचाऱयांनी धीर सोडला नाही. मानस-मानसीला एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि दोघेही चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले, दोघांचेही सूर जुळले. 30 सप्टेंबरला दोघांचे शेवटचे मीलन झाले आणि नॅशनल पार्कमध्ये गोड बातमी पसरली. गर्भारपणामध्ये तर मानसीचीच दादागिरी वाढली होती. मानसी सिंहिणीचं बाळंतपण सुरळीत व्हावं म्हणून वाघाईच्या देवळात प्रार्थनाही करण्यात आली होती.

अडीच महिन्यांनंतर पर्यटकांना दर्शन

छाव्याला जन्म दिल्यानंतर मानसीला औषधोपचार, कॅल्शियम देऊन तिची काळजी घेतली जात आहे. तर छाव्याचे डोळेही 15 दिवसांनी उघडणार असल्याने त्याच्यावरही नजर ठेवण्यात येत आहे. तो थेट सूर्यकिरण झेलू शकणार नसल्याने त्याला सुरुवातीला त्यांच्यासाठी बनवलेल्या नैसर्गिक आवासात दीड महिना, नंतर सोबच्या क्रोलमध्ये ठेवले जाईल. अडीच महिन्यानंतरच त्याचे पर्यटकांना दर्शन घडेल.