सर्वात सुंदर साध्वीला अश्रू अनावर, हर्षा रिछारिया महाकुंभ सोडणार

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेत असलेली सर्वात सुंदर साध्वी अशी ख्याती मिळवलेली हर्षा रिछारिया अर्ध्यावरच महाकुंभ सोडणार आहे. महाकुंभाच्या पहिल्या अमृत स्नानमध्ये हर्षाला सहभागी करून घेतल्यानंतर आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथात बसवल्यावरून अनेकांनी विरोध दर्शवला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. शाकुंभरी पीठाधीश्वर आणि काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप यांनी हे सर्व धर्माच्या विरोधात आहे, असे म्हटले होते. अनेकांनी विरोध केल्याने हर्षा या दुःखी झाल्या असून त्यांनी महाकुंभ अर्ध्यावर सोडण्याचे जाहीर केले आहे.

मी सनातनला चांगले समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु काही लोकांनी मला लक्ष्य केले. ज्यांनी मला विनाकारण टार्गेट केले त्यांना पाप लागेल, असे सांगताना हर्षा यांना अश्रू अनावर झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षा रिछारिया यांनी शाकुंभरी पीठाधीश्वर आणि काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप महाराज यांच्यावर टीका केली. दरम्यान, हर्षा रिछारिया यांनी महाकुंभ सोडण्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हर्षा यांनी घेतलेल्या निर्णयाचे काही लोकांनी कौतुक केले आहे.

त्यांना पाप लागेल

लाजा वाटल्या पाहिजेत. एक मुलगी धर्माशी जोडण्यासाठी आली होती. धर्म समजून घेण्यासाठी आली होती. सनातन संस्कृतीला समजून घेण्यासाठी आली होती, परंतु तिला महाकुंभ पूर्ण होईपर्यंतसुद्धा या ठिकाणी थांबू दिले नाही. महाकुंभ आपल्या आयुष्यात एकदा येतो. तुम्ही तेही माझ्याकडून हिरावून घेतले. पुण्यचे माहीत नाही, परंतु जे आनंद स्वरूपजी आहेत, त्यांना पाप मात्र लागेल, असे हर्षा यांनी म्हटले आहे.

महाकुंभातून जाणार

धर्म समजून घेण्यासाठी आले होते, परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला अनेकांनी टार्गेट केले. मी आता या ठिकाणी थांबणार नाही. मी ज्या ठिकाणाहून आली होती, त्या ठिकाणी परत जाणार आहे. संपूर्ण महाकुंभ होईपर्यंत या ठिकाणी थांबणार होते, परंतु आता थांबण्यात काही अर्थ नाही. मी सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी आले होते, परंतु हा सर्व प्रकार पाहून मी खूप दुःखी आहे. मी काही साध्वी नाही, असेही हर्षा यांनी स्पष्ट केले.