आयआयटीयन बाबाने आश्रम सोडला, आई-वडील पोहोचण्याआधीच अज्ञातस्थळी

महाकुंभातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयआयटीयन साधूबाबा ऊर्फ अभय सिंह यांनी आश्रम सोडला आहे. ते अचानक अज्ञातस्थळी गेल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी त्यांचे आई आणि वडील त्यांचा शोध घेत जुन्या आखाडय़ातील 16 माडी आश्रमात पोहोचले होते, परंतु ते येण्याआधीच आयआयटीयन बाबा निघून गेले. प्रसिद्धीच्या झोतात आल्यापासून आयआयटीयन बाबा सतत मीडियाला मुलाखती देत होते. त्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढत होता. त्यांनी मीडियामध्ये काही गोष्टीही सांगितल्या, ज्या वादाचे कारण बनल्या. अशा परिस्थितीत त्यांनी आश्रम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अभय यांनी कोचिंगनंतर आयआयटीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांना आयआयटी मुंबईत प्रवेश मिळाला. अभय यांनी तेथून एअरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी घेतली. यानंतर त्यांनी डिझायनिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. आयआयटी मुंबईमधून एअरोस्पेस इंजिनीअरिंग केले आहे. यानंतर ते कॅनडाला गेले आणि विमान बनवणाऱया कंपनीत कामाला लागले. मात्र अचानक ते देशात परतले आणि काही काळानंतर घरातून गायब झाले. त्यानंतर ते थेट साधूबाबा बनण्याचे समोर आले.

अभ्यासात हुशार

अभय सिंह हे मूळचे हरयाणातील झज्जर जिह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील करण सिंग हे वकील असून ते झज्जर बार असोसिएशनचे अध्यक्षही राहिले आहेत. अभय यांनी सुरुवातीचे शिक्षण झज्जर जिह्यातून केले. ते अभ्यासात खूप हुशार होते. यानंतर कुटुंबीयांना त्यांना आयआयटी कोचिंगसाठी कोटा येथे पाठवायचे होते, पण अभय यांनी दिल्लीत कोचिंग घेण्याचे सांगितले.

कॅनडाहून परतल्यानंतर ध्यानसाधना

लॉकडाऊनच्या काळात अभय हे कॅनडामध्ये अडकले होते. लॉकडाऊनच्या काळात एकटे पडल्यानंतर ते आयुष्याचा अधिक गंभीरपणे विचार करू लागले. लॉकडाऊन उठल्यानंतर अभय देशात परतले. इथे आल्यानंतर त्यांनी अचानक फोटोग्राफी करायला सुरुवात केली. फोटोग्राफीसाठी केरळला गेले. नंतर उज्जैन कुंभलाही गेले. हरिद्वारलाही गेले. त्यानंतर घरीही ध्यानधारणा सुरू केली. त्यांच्या मनात काय चालले आहे, हे कुटुंबातील कोणालाच कळत नव्हते.