>> दिलीप ठाकूर
‘ही सांज बहरलेली हा प्रणय धुंद वारा’, ‘झुल्यावानी झुलतया माझं कसं अंग’, ‘हिमशिखरा चुंबाया नभ धरणीवरती आलं’, ‘समीप राहिलो तरी असे अजून दूर का’ ही गीते रवींद्र महाजनी लिखित व दिग्दर्शित ‘सत्तेसाठी काहीही’ (2002) या चित्रपटातील आहेत. या चित्रपटात गीत-संगीताला आवश्यक इतपतच स्थान होते. याचे कारण त्याचा विषय, पण त्यातही संगीतकार राहुल घोरपडे यांनी काही वेगळे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 12 जानेवारी 2025 रोजी सकाळीच राहुल घोरपडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वप्रथम ही गाणी आठवली. अजित शिरोळे दिग्दर्शित ‘बोडक्याचा बाजीराव’ (2008) या चित्रपटाला संगीत देतानाही राहुल घोरपडे यांनी ‘चैत्राची रात’, ‘विठू तुझ्या चरणी’ अशी विविधता त्यात दिली. त्याच वर्षी अजित शिरोळे दिग्दर्शित ‘रंगराव चौधरी’ या चित्रपटासाठी राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेली ‘आज योग आला देवा आलो तुझ्या दारी’, ‘ध्यास लागला कळीस राया फूल टपोरे करा’ ही गाणी श्रवणीय आहेत. त्यांनी संगीत नाटक, ध्वनिफीती, मालिका यातून बरेच लक्षवेधक कारागिरी केली. रंगमंच व दृश्य माध्यम अशा दोन्हीत त्यांनी भरपूर मेहनत घेऊन काम केले. दूरदर्शनसाठी महाराष्ट्रातील तेरा कवींच्या कवितांवर आधारित ‘कवी शब्दांचे ईश्वर’ ही त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व मेहनतीने साकारलेली मालिका विशेष उल्लेखनीय. त्या त्या कवीच्या स्वभावधर्मानुसार त्या कवीचे चित्रीकरण व्हावे याकडे त्यांचा कल राहिला. आरती प्रभू यांच्या कविता साकारताना ती कविता त्या मातीचा गंध घेऊन कशी येईल याची काळजी त्यांनी घेतली आणि कला क्षेत्रात या मालिकेची आजही आठवण काढली जाते हे एक राहुल घोरपडे यांचे यश. राहुल यांचा जन्म पुणे येथे झाला आणि त्यांनी पुणे शहराला आपली कर्मभूमी मानली. त्यात त्यांचे मन रमले. त्यांचे वाचन चांगले असल्याने अनेक कवींच्या कविता भावार्थासह मुखोद्गत असणारे असे ते संगीतकार. हृदयनाथ मंगेशकर यांना ते गुरुस्थानी मानत.
चित्रपट गीतकार म्हणून ख्यातनाम असलेल्या साहिर लुधियानवी यांच्या गीत रचनेत उर्दूचा अतिशय समर्पक वापर. त्यांच्या ‘परछाईयाँ’ दीर्घकाव्यावर कवी सुधीर मोघे रूपांतरित ‘पडछाया’ ही संगीतिका पुरुषोत्तम करंडकमध्ये सादर करण्यात आली, त्याला संगीत राहुल घोरपडे यांचे होते. राहुल घोरपडे यांचा कार्यविस्तार अतिशय बहुस्तरीय व कौतुकास्पद. पौराणिक काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंतच्या स्त्राr वादाची भूमिका गायन, वादन व अभिवाचन यातून साकारलेल्या ‘निजखूण’ या रंगमंचावरील कार्यक्रमात त्यांचा विशेष सहभाग. ‘सुनीला पारनामे शाळेला चालली होती’ या एकांकिकेसाठी आपल्या महाविद्यालयासाठी पुरुषोत्तम करंडकही पटकावला होता. ‘स्वरानंद’ पुणे निर्मित गदिमा गीतांच्या कार्यक्रमाद्वारे गायक म्हणून व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केले. ग. दि. माडगूळकर यांच्या ‘दिला जन्म तू विश्व हे दाविलेस’ या गीताला त्यांनी दिलेले संगीत काwतुकास्पद. ‘गाणी मंगेशकरांची’, ‘हे स्वप्नांचे पक्षी’ – संगीतकार श्रीनिवास खळे यांची गाणी, ‘गाणी तुमची आमची’, ‘मँहकती यादें’, ‘याद किया दिलने’, ‘दी बर्मन्स’ इत्यादी अनेक मराठी व हिंदी लोकप्रिय गाण्यांच्या कार्यक्रमांची निर्मिती, सादरीकरण त्यांनी केले. हा झपाटा विलक्षण. पुणे शहरातील ‘अनन्वय’ या साहित्यविषयक चळवळ करणाऱया संस्थेचे संस्थापक सदस्य होते. या संस्थेतर्फे अनेक प्रतिथयश तसेच नवोदित कवींच्या कवितेच्या कार्यक्रमांचे संगीत दिग्दर्शन राहुल घोरपडे यांनी केले.
‘मोरया गोसावी’ मालिकेसाठी पार्श्वसंगीत राहुल घोरपडे यांनी दिले होते. ‘जाहला सूर्यास्त राणी तुझ्या वंदितो माऊली’, ‘पावलास भाग्यवान असे आम्ही’, ‘गर्जा जयजयकार’, ‘लय दिस झाले बाई’, ‘गणनायक गणपती’ या लोकप्रिय गाण्यांचे संगीत राहुल घोरपडे यांचे. ‘जागर’, ‘ड्रॉपर्स’ वगैरे नाटय़ संस्थांच्या ‘राजा ईडिपस’, ‘दंबद्वीपचा मुकाबला’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘वाटा पळवाटा’ इत्यादी नाटकांचे पार्श्वसंगीत राहुल घोरपडे यांचेच. चांगल्या आणि विविधांगी कामाचा जणू ध्यास असल्यानेच त्यांचा हा प्रवास लक्षवेधक ठरला. प्रसिद्धीच्या झोतात न राहता आपल्या कामावरची निष्ठा व बांधीलकी त्यांनी कायमच जपली. म्हणूनच एक दर्जेदार काम होतेय तोच ते आणखीन एका कामात रमत. वि. वा. शिरवाडकरांच्या कथेवर आधारित ‘नंदनवन’ या मुलांच्या संगीत-नृत्य नाटय़ाचे संगीत दिग्दर्शन राहुल घोरपडे यांचेच. राहुल घोरपडे यांनी आपली स्वतंत्र ओळख व स्थान निर्माण केले होते. एका ध्येयवादी संगीतकाराने गीत-संगीताची रंगलेली मैफल अचानक सोडली हे दुर्दैव.