वेब न्यूज – झिम्बाब्वेचा मोगली

जंगल जंगल बात चली है’ हे गाणे ऐकले की, डोळय़ांपुढे रम्य ते बालपण धावायला लागते. जंगलातील पशू-पक्ष्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे, मानवी संस्कृतीचा गंधदेखील नसलेले टारझन, मोगली हे फक्त लहानग्यांचे नाही तर जगभरातील सर्व वयोगटातील लोकांचे आवडते नायक आहेत. त्यांच्या कथांवर आधारित अनेक चित्रपट, मालिका जगातील अनेक प्रमुख देशांत खूप गाजल्या आणि त्या नव्यानेदेखील निघत आहेत. सध्या असाच एक वास्तवातला मोगली जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. टिनोटेंडा पुंडू असे या आठ वर्षांच्या चिमुरडय़ाचे नाव आहे
.
उत्तर झिम्बाब्वेमध्ये एका छोटय़ा गावात राहणारा टिनोटेंडा पुंडू खेळता खेळता रस्ता भरकटला आणि थेट गावाला लागून असलेल्या जंगलात शिरला. परतीचा मार्ग शोधता शोधता तो जंगलात अजून आत आत शिरत गेला. बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही आणि सोबतीला धोकादायक जंगल अशा विचित्र परिस्थितीत अडकलेला पुंडू डगमगला नाही. हे जंगल काही साधेसुधे जंगल नाही तर चक्क माटुसाडोना नॅशनल पार्क होते. या जंगलात सिंह, बिबटे, जंगली हत्ती आणि म्हशी यांचा मुक्त संचार असतो. अशा वेळी पुंडूने सर्व परिस्थितीचा खूप धैर्याने सामना केला.

नेहमीच्या आयुष्यात त्याला जमीन खोदून पाणी कसे मिळवायचे, नदीचा काठ कसा शोधायचा हे शिक्षण मिळालेले होते. त्याने त्याचा सुंदर उपयोग करत एका काठीच्या साहाय्याने आधी नदीचा किनारा शोधला आणि नंतर तिथले पाणी तो पिऊ लागला. झाडाची फळे अन्न म्हणून उपयोगी पडू लागली. पुंडू इतका चाणाक्ष की, झोपताना तो कायम उंच जागांचा वापर करत असे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांपासून त्याचा बचाव होत होता. गावापासून 50 किलोमीटर भरकटलेला पुंडू अखेर पाच दिवसांनी रेंजर्सच्या नजरेत आला आणि त्याची सुटका झाली. पुंडूचे सुखरूप परत येणे हा एक चमत्कार असल्याचे त्याच्या गावचे लोक सांगत आहेत.