>> ब्रिगेडियर हेमंत महाजन [email protected]
चीनने विकसित केलेल्या एका मशीनने जगाला आश्चर्यचकित केले आहे. ही मशीन आहे ‘माइंड रीडिंग मशीन.’ यापूर्वीही माइंड रीडिंग मशीनवर काम करण्यात आले आहे, परंतु या मशीनच्या अचूक डीकोडिंगमुळे ही मशीन सध्या चर्चेत आहे. माइंड रीडिंग मशीन हे एक अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान आहे, ज्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यावर त्याचे भविष्य अवलंबून आहे.
‘माइंड रीडिंग मशीन’ हे एक तंत्रज्ञान आहे, जे मानवी विचार आणि मेंदूतील क्रियाकलाप वाचण्याचा दावा करते. हे तंत्रज्ञान मेंदूच्या लहरी आणि न्यूरल ऑक्टिव्हिटीचे विश्लेषण करून काम करते व त्याला शब्दामध्ये दाखवते. चिनी स्टार्टअप कंपनी ‘NeuroAccess’ ने विकसित केलेल्या ‘ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस’ (BCI) उपकरणाने मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांचे विचार रिअल-टाइममध्ये डीकोड केले . हे उपकरण रुग्णाच्या मेंदूच्या मोटर क्षेत्रामध्ये जागा व्यापणाऱया जखमांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पूर्वी विकसित केलेल्या माइंड रीडिंग मशीनमध्ये अचूकता आणि रिअल-टाइम डीकोडिंगची कमतरता होती. नवीन मशीन उच्च अचूकता आणि त्वरित विचार डीकोड करण्याची क्षमता असल्याचा दावा करते. हे उपकरण रुग्णाच्या मेंदूतील सूक्ष्म बदलांनाही ओळखू शकते.
चिनी स्टार्टअप कंपनी `NeuroAccess’ ने यशस्वी चाचण्या केल्या. कंपनीने विकसित केलेल्या ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) उपकरणाने मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णाचे विचार रिअल-टाइममध्ये डीकोड केले. त्याचवेळी एका वेगळ्या चाचणीमध्ये या उपकरणाने रिअल-टाइममध्ये चिनी भाषाही डीकोड केली. बीसीआय तंत्रज्ञानामुळे रुग्णांना त्यांच्या मनाने सॉफ्टवेअर नियंत्रित करणे, वस्तू हाताळणे, एआय मॉडेल्सशी संवाद साधणे आणि भाषणाचा वापर करून डिजिटल अवतार नियंत्रित करणे शक्य झाले आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये न्यूरोसर्जन्सनी बीसीआय उपकरण 21 वर्षीय एपिलेप्सी असलेल्या महिला रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले. NeuroAccess टीमने रुग्णाच्या मेंदूच्या सिग्नलच्या उच्च-गामा बँडमधून इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राम (ECoG) काढला. त्यानंतर त्यांनी रिअल टाइममध्ये (ECoG) डीकोड करण्यासाठी न्यूरल नेटवर्प मॉडेलला तयार केले. या प्रक्रियेने शस्त्रक्रियेच्या काही मिनिटांत मेंदूच्या कार्यक्षेत्रांचे अचूक मॅपिंगही केले.
मेंदूच्या सिग्नलवरून भाषा समजून घेणे ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) तंत्रज्ञानाचा झालेला विकास दाखवते. डिसेंबर 2024 मध्ये चिनी भाषणाचे संश्लेषण करण्यासाठी बीसीआयची देशातील पहिली क्लिनिकल चाचणी घेतली. संशोधकांनी 256-चॅनेल ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) एपिलेप्सीने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले, तिला भाषेचे सिग्नल देणाऱया मेंदूच्या भागात टय़ूमरदेखील होता. महिला रुग्ण बरी झाली आणि उपकरणाने पाच दिवसांत 71 टक्के स्पीच डीकोडिंगची अचूकता गाठली. 142 सामान्य चिनी अक्षरांचा संच वापरून ही अचूकता प्राप्त केली गेली.
2023 मध्ये कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांचा माइंड रीडिंग मशीन विषयक एक अभ्यास प्रकाशित झाला होता. कॅलिफोर्नियातील संशोधक 79 टक्के अचूकतेसह सहभागींचे विचार शब्दांमध्ये डीकोड करण्यास सक्षम होते. हे उपकरण पॅलटेकच्या टी अॅण्ड सी चेन ब्रेन-मशीन इंटरफेस सेंटरने विकसित केले आणि याचा भाषणात अडथळा असणाऱया लोकांना व त्यासंबंधित विकार असणाऱया रुग्णांना मदत होईल, असा दावा करण्यात आला होता. हे ‘स्पीच डीकोडर’ मेंदू-मशीन इंटरफेस म्हणून काम करतात आणि भाषणादरम्यान मेंदूची क्रिया कॅप्चर करतात व त्याला भाषेत अनुवादित करतात.
‘माइंड रीडिंग मशीन’ रिमोट प्रकारेसुद्धा वापरले जाऊ शकते. यात धोकेसुद्धा आहेत.व्यक्तीच्या विचारांची माहिती सार्वजनिक झाल्यास गैरवापर होण्याची शक्यता आहे. मानवी विचारांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्रज्ञान नैतिकदृष्टय़ा किती योग्य आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे तंत्रज्ञान गुन्हेगारी किंवा हेरगिरीसाठी वापरले जाऊ शकते. पोलीस आणि लष्करी कारणांसाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो. माइंड रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मनावर प्रचार किंवा मानसिक युद्ध करून त्याचे त्याच्या संमतीशिवाय मतपरिवर्तन करण्याकरिता केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर ‘मन युद्ध’/‘माइंड युद्ध/मेंदू युद्धाकरिता (Mind warfare) पण करता येऊ शकतो. असे अहवाल आहेत की, पूर्वीचे USSR अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांचे ‘मन युद्ध’चे लक्ष्य होते. त्यांच्या ग्लासनोस्त (मोकळेपणा) आणि पेरिस्त्र्ााsईका (पुनर्रचना) या धोरणांमुळे सोव्हिएत युनियनचे विभाजन झाले. हे त्यांच्या मनाच्या फेरफारातून झाले आणि त्यांच्या मनावर आघात करून ग्लासनोस्ट आणि पेरेस्ट्रोइका या धोरणांशिवाय पर्याय नाही असे बिंबवण्यात आले. युरोप आणि अमेरिकेच्या चीनमधील वकिलातीच्या काही कर्मचाऱयांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या मनावर परिणाम केला गेला, ज्यामुळे त्यांना तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागला. मात्र चीनच्या बाहेर आल्यानंतर त्यांना होणारा त्रास थांबला.
चीन एक अत्यंत विश्वासघातकी देश आहे आणि माइंड युद्ध/मेंदू युद्धाकरिता (Mind warfare) माइंड रीडिंग मशीनचा गैरवापर चीन एक शस्त्र म्हणून नक्कीच करू शकतो. त्याकरिता भारताने अशा शस्त्रांच्या गैरवापर थांबवण्याकरिता कारवाया करणे गरजेचे आहे. अशाच प्रकारचे तंत्रज्ञान भारतानेसुद्धा विकसित करावे, ज्यामुळे गरज पडल्यास चीनला आपण जशास तसे असे उत्तर देऊ शकतो. भारताशिवाय अमेरिका, युरोपसुद्धा या विषयावरती संशोधन करत आहे. त्यांची मदत घेऊन चीनविरोधात आपले संरक्षण अजून मजबूत करू शकतो. आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर सक्षमपणे केला जावा. चीनने कोरोना काळामध्ये अत्यंत गैर बेजबाबदार वागणूक करून सगळ्या जगामध्ये चिनी व्हायरस पसरवला. तसे या शस्त्रांच्या बाबतीत होऊ नये याकरिता जगाला एकत्रित आणण्याकरिता भारताचा पुढाकार महत्त्वाचा आहे.