अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे त्याच्या वांद्रे येथील घरी चोरट्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियाही झाली.
सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या घराखाली एकही गाडी नव्हती त्यामुळे तो रिक्षाने लीलावती रुग्णालयात आल्याचे समोर आले आहे. सैफला रुग्णालयात घेऊन येणारा रिक्षाचालक भजन सिंह याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा सैफ घरातून बाहेर आला तेव्हा तो रक्तबंबाळ अवस्थेत होता, त्याला पाहून मी देखील काही वेळासाठी घाबरलो. त्यानंतर तो त्याच्या मुलाला घेऊन रिक्षात बसला व मी त्यांना लीलावती रुग्णालयात सोडले.
बुधवारी रात्री मी वांद्रे येथून जात असताना एक महिला इमारतीच्या गेटमधून धावत बाहेर आली व रिक्षा रिक्षा ओरडत होती. मी युटर्न घेऊन तिच्याकडे आलो. त्यावेळी सैफ अली खान कुर्ता पँट घालून रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर आले. त्यांच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी जखमा होत्या. त्यांना पाहून मी देखील घाबरलो. तोपर्यंत माझ्या रिक्षात कोण बसलंय हे मला माहित नव्हतं. रुग्णालयात पोहोचलो तेव्हा सैफ स्वत: चालत आत गेला. मी त्यांच्याकडून रिक्षाचे भाडे देखील घेतले नाही. त्यानंतर जेव्हा लोकांची चर्चा सुरू झाली तेव्हा मला कळलं की तो सैफ अली खान होता, असे भजन सिंह याने सांगितले.