पुणे-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. आयशरची धडक बसून प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स ऑटो चेंडूसारखी उडाली आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या एसटीवर आदळली. या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. मात्र ब्रेक फेल झाल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. याचवेळी प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स ऑटो वेगाने येत होती आणि त्यामागे आयशर टेम्पो होता. आयशर टेम्पोने मॅक्स ऑटोला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की मॅक्स ऑटो चेंडूसारखी हवेत उडाली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या एसटी बसवर आदळली.
अपघात झाला तेव्हा मॅक्स ऑटोमधून चालकासह 12-13 प्रवासी प्रवास करत होते. आयशरच्या धडकेमुळे मॅक्स ऑटोचा चक्काचूर झाला असून यात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तीन ते चार प्रवासी जखमी झाले असून अपघातानंतर आयशरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.