मुंबईतून केवळ दोन तासांत फुफ्फुस चिंचवडमध्ये! ग्रीन कॉरिडॉरमुळे एकाला जीवनदान

मुंबईतील जेजे हॉस्पिटलमधील ब्रेन डेड रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका रुग्णाला जीवनदान मिळाले. ब्रेन डेड रुग्णाचे फुफ्फुसाचे डीपीयू हॉस्पिटलमधील रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रीन कॉरिडॉरद्वारे मुंबईतील जेजे रुग्णालयातून अवघ्या दोन तासात १५० कलोमीटरचे अंतर पार करत फुफ्फुस चिंचवड येथे पोहचवण्यात आले.

३६ वर्षीय एका ट्रक ग्रीन कॉरिडॉरमुळे एकाला जीवनदान चालकाचा गंभीर अपघात झाला होता. उपचारासाठी मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. त्यांनतर ट्रक चालकाच्या कुटुंबीयांचे अवयव दानाबाबत समुपदेशन करण्यात आले. या कुटुंबाने अवयव दानाचा धाडसी निर्णय घेतला. अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या प्रतीक्षा यादीनुसार त्यांचे फुफ्फुस पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अवयवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णाला देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार जीवनरक्षक असणाऱ्या या फुफ्फुसाचा प्रवास सुरू झाला. पोलीस विभागाने ग्रीन कॉरिडॉरद्वारे हे फुफ्फुस दोन तासांत चिंचवडमध्ये पोहचवले. पोलीस अधिकारी, कर्मचारी, डीपीयू हॉस्पिटलमधील डॉ. राहुल केंद्रे आणि डॉ. समीर चौहान यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथके आणि ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सहायक कर्मचाऱ्यांनी सुरक्षित व सुनिश्चित वेळेत प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉक्टरांची टीम आणि प्रशासकीय यंत्रणांचे प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी डॉक्टरांचे कौतुक केले, तर अवयवदात्याच्या कुटुंबीयांचा धाडसी निर्णय प्रेरणादायी असल्याचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. संदीप अट्टावार यांनी सांगितले.