मराठी, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणार; दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा निर्धार

हिंदी भाषेत उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता आपण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहोत, तो चित्रपट ऐतिहासिक असेल, असे सुप्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले. चित्रपट कोणता असेल, यासंदर्भात जून महिन्यात अधिकृत जाहीर केले जाईल, असेही ते म्हणाले.

मराठवाड्यातील रसिकांसाठी जगभरातील उत्कृष्ट चित्रपट सादर करणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी आशुतोष गोवारीकर यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. महोत्सवाचे कार्यकारी संचालक, प्रसिध्द दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, जयप्रद देसाई यांनी ही मुलाखत घेतली. याप्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, संयोजक निलेश राऊत, प्रा. शिव कदम, प्रा. डॉ. दासू वैद्य, डॉ. कैलास अंभुरे आदींची उपस्थिती होती.

लगान, जोधा अकबर, स्वदेश अशा एकापेक्षा एक अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर मराठी चित्रपटाच्या निर्मितीकडे कधी वळणार, असा प्रश्न उपस्थित केला असताना गोवारीकर म्हणाले, मराठी चित्रपटाची लवकरच निर्मिती करणार आहे. तो चित्रपट ऐतिहासिक असेल. यासबंधीची अधिकृत घोषणा जूनमध्ये केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आशुतोष गोवारीकर यांनी यावेळी आतापर्यंतच्या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीच्या बारकाव्यांवर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी लगान, स्वदेश, जोधा अकबर आदि चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया यावेळी मांडली.

संयोजकांच्या वतीने आज दोन महत्त्वपूर्ण मास्टरक्लास आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, दिग्दर्शक आणि अभिनेता तिग्मांशू धुलिया यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला. धुलिया यांनी सिनेमा क्षेत्रातील आपले अनुभव, आव्हाने आणि यशस्वी चित्रपट निर्मितीच्या पद्धतीवर मार्गदर्शन केले. आज मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धेतील 3 लघुपट आणि 3 विशेष लघुपट दाखविण्यात आले.