Saif Ali Khan Attacked – मुंबई पोलिसांच्या 7 टीमकडून तपास सुरू; फॉरेन्सिक टीम सैफच्या घरी दाखल, CCTV फुटेज तपासले

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने पावलं उचलली आहेत. मुंबई पोलिसांनी तपासासाठी 7 टीम नेमल्या आहेत. या टीमकडून तपास सुरू झाला आहे. यासोबतच गुन्हे शाखेच्या 8 टीम नेमण्यात आल्या आहेत. सैफवरील हल्ल्याप्रकरणी तपासासाठी एकूण 15 टीम नेण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि क्राइम ब्रँचची टीम सैफ अली खानच्या वांद्रेमधील ‘सद्गगुरू शरण’ घरी दाखल झाली आहे. फॉरेन्सिक टीमने काम सुरू केले आहे. तपास पथकातील पोलीस अधिकारी दया नायक यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांनी सैफ अली खानच्या घरी जाऊन तपास केला. सैफ अली खानच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

सैफ अली खानच्या घरी पोलिसांच्या पथकाने दोन तास तपास केला. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना कुठलाही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे हल्लेखोर इमारतीत आधीपासून घुसलेला होता, असा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी दया नायक यांच्यासह पोलिसांचे तपास पथक सैफ घरातून बाहेर पडले आहेत.

आता सैफ अली खान याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सैफचा जबाब नोंदवला जाणार आहे. सैफ अली खानवर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या शरीरावर एकूण सहा वार करण्यात आले आहेत. एक वार त्याच्या पाठीच्या कण्यावर झाला आहे, अशी माहिती लीलावती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.