AI संदर्भात मार्क झुकरबर्ग यांचं मोठं विधान; डेव्हलपर्सच्या नोकऱ्या येणार धोक्यात?

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी डेव्हलपर्सच्या नोकऱ्यांच्या भविष्याबद्दल नवीन चिंता व्यक्त केली आहे. मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मेटामधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कंपनीतील मध्यम-स्तरीय सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या क्षमतांपर्यंत प्रमाणे काम करू लागले आहे. YouTuber जो रोगन यांच्यासोबतच्या पॉडकास्ट दरम्यान, झुकरबर्ग यांनी कोडिंगमध्ये AI ची भूमिका आणि त्यामुळे नोकऱ्यांवर होणारे परिणाम याबद्दल त्यांचे विचार शेअर केले.

मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं की 2025 पर्यंत, मेटा आणि इतर टेक कंपन्यामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असून सध्याचे AI हे कोड लिहिणाऱ्या मध्यम-स्तरीय इंजिनिअर्सची जागा घेऊ शकतात. टेक कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटकडे कसे पाहतात त्यावर पुढली दिशा ठरेल.

‘आम्ही अशा टप्प्यावर पोहोचू जिथे आमच्या अॅप्समधील सर्व कोड आणि ते निर्माण करणारे AI देखील इंजिनिअर्स ऐवजी AI कडून लिहिले जातील’ – मार्क झुकरबर्ग

‘आम्ही अशा टप्प्यावर पोहोचू जिथे आमच्या अॅप्समधील सर्व कोड आणि ते निर्माण करणारे AI देखील इंजिनिअर्स ऐवजी AI कडून लिहिले जातील’, असं मार्क झुकरबर्ग म्हणाले. याच संदर्भात, बिझनेस इनसाइडरने वृत्त दिलं आहे की मेटामधील मध्यम-स्तरीय सॉफ्टवेअर इंजिनिअर्स सध्या सहा आकड्यांपर्यंतचे पगार घेतात. मात्र AI मुळे कंपनीचा हा खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

झुकरबर्ग यांचं हे विधान अशा वेळी आलं आहे जेव्हा गुगल आणि आयबीएम सारख्या इतर टेक दिग्गज कंपन्या देखील त्यांच्या ऑपरेशन्समध्ये AI चा समावेश करत आहेत. ज्यामुळे इंजिनिअर्सच्या नोकऱ्यांसंदर्भात अशीच चिंता निर्माण झाली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अलीकडेच जाहीर केले की गुगलमधील सर्व नवीन कोडपैकी 25 टक्क्यांहून अधिक कोड आता AI द्वारे तयार केले जातात. यात मानवाची गरज अगदी अंतिम पुनरावलोकनासाठी असेल. दरम्यान, आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी 2023 मध्ये खुलासा केला की AI कंपनीच्या 30 टक्क्यांपर्यंत बॅक-ऑफिस भूमिकांची जागा घेऊ शकते. विविध क्षेत्रांमध्ये दिसणारा हा ट्रेंड पारंपारिक कोडिंग जॉब्सच्या भविष्याबद्दल मोठी चिंता निर्माण करत आहे.

मानवी इंजिनिअर्सच्या नोकऱ्या धोक्यात आहेत?

झुकरबर्ग यांच्या कोडिंग कामे पूर्ण करण्याबद्दल AI च्या विधानाने असं स्पष्ट होत आहे की मानवी इंजिनिअर्सची भूमिका बदलत आहे, ज्यामुळे कोडिंगच्या नोकऱ्या कमी होऊ शकतात. रोजच्या कामांऐवजी, मोठ्या समस्या सोडवण्यावर आणि एआय-जनरेटेड कोडच्या देखरेखीवर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागेल.