Pune crime news – डिलिव्हरी बॉयकडून दिवसा रेकी, रात्री घरफोडी; 86 तोळे सोने, 150 हिरे, साडेतीन किलो चांदी जप्त

दिवसा डिलिव्हरी बॉयचे काम करीत रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारांसह स्वारगेट पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 14 घरफोडींमधील तब्बल 80 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. 86 तोळे सोने, 150 हिरे, साडेतीन किलो चांदी, 2 पिस्तुलांचा यामध्ये समावेश आहे.

गणेश मारुती काठेवाडे (रा. मुखेड, जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय – 36, रा. अंबरवेड, ता. मुळशी) आणि भीमसिंग ऊर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (रा. सांगवी, मूळ. रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

19 डिसेंबर रोजी स्वारगेट भागातील सॅलेसबरी पार्कमध्ये घरफोडी झाली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाला गणेश काठेवाडेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने गणेशला ठंड्री येथून पकडले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने स्वारगेटसह कात्रज, बिबवेवाडी, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी घरफोडी केल्याचे समोर आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 1 हजार 700 सीसीटीव्ही तपासले.

पवार माजी उपसरपंच

काठेवाडे याच्यावर मोक्कानुसार कारवाई झाली होती. त्याच्यावर 55 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. तर गुन्ह्यातील त्याचा साथीदार सुरेश पवार हा मुळशीतील असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच तो माजी उपसरपंच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई झाली होती. त्यावेळी कारागृहात असताना दोघांची ओळख झाली.

परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, कुंदन शिंदे, रफिक नदाफ, नाना भांदुर्गे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, राहुल तांबे, सचिन तनपुरे, सतीश कुंभार, शरद गोरे, रमेश चव्हाण, संजय भापकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.