आपल्या धमाकेदार शॉर्ट-सेलिंग रिपोर्ट्सने आर्थिक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) कंपनी बंद होत आहे. कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी बुधवारी ही घोषणा केली. त्यामुळे बड्या आर्थिक साम्राज्यांना हादरवून सोडणाऱ्या कंपनीचा शेवट झाला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने हिंदुस्थानातील अदानी समूहावर आरोप केले होते.
नेट अँडरसन यांनी गेल्या वर्षीच हा निर्णय आधीच कुटुंबीय, मित्रांना तसेच सहकाऱ्यांना याची कल्पना दिल्यांच रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ‘गेल्या वर्षच्या अखेरीस मी कुटुंब, मित्र आणि आमच्या टीमसोबत शेअर केल्याप्रमाणे, मी हिंडेनबर्ग रिसर्च बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ज्यावर काम करत होतो त्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर ही कंपनी बंद करण्याची योजना होती. आम्ही ठरवलेली कामे नुकतीच पूर्ण केली आहेत. त्यामुळे आजचा शेवटचा दिवस आहे’, असं अँडरसन म्हणाले.
‘आम्हाला गरज वाटली तेव्हा मोठ्या आर्थिक साम्राज्यांना आम्ही जबरदस्त धक्का दिला’, असं देखील ते म्हणाले.
2017 मध्ये स्थापन झालेली हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी ही कथित कॉर्पोरेट फसवणूक आणि चुकीची माहिती उघड करण्यासाठी प्रसिद्ध झाली. या कंपनीच्या अहवालांमुळ मोठ्या कंपन्यांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. ज्या कंपन्यांवर आरोप करण्यात आला त्या कंपन्यांचे बाजारात मोठे नुकसान झाले आहे.