अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला, घरात शिरलेल्या चोरानं भोसकलं; लीलावतीमध्ये उपचार सुरू

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाला आहे. घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि यात त्याच्या मानेला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सैफ अली खान याचे वांद्रे पश्चिम येथे घर असून मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याच्या घरात चोराने प्रवेश केला. याची चाहूल लागल्यानंतर घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र चोराने तिच्यावर चाकूने वार केला. तिचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान याने तिकडे धाव घेतली. यावेळी चोर आणि सैफमध्ये झटापट झाली. या दरम्यान चोराने सैफ अली खानवर एकामागोमाग एक चाकूने सपासप वार केला. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आहे, असे वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिले आहे.

चाकू हल्ल्यात सैफ अली खान याला दुखापत झाली असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात तपास पोलिसांनी सुरू केला असून मुंबई क्राइम ब्रँचही सैफच्या घरी जाऊन तपास करणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या प्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून अज्ञात चोराला पकडण्यासाठी पोलीस पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

सैफ अली खान याला गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या असून त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. यातील एक जखम मणक्याच्या जवळ आहे. त्याच्यावर न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन, भूलतज्ञ निशा गांधी यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे सीईओ निरज उत्तमानी यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. सैफ अली खान याला कोणतीही धमकी मिळाली नव्हती. त्यामुळे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीसही संभ्रमात आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे.