मनू भाकर ऑलिम्पिक पदके परत करणार!

हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विक्रमी दोन कांस्य पदके जिंकून देणारी नेमबाज मनू भाकर आपली पदके परत करणार आहे. अवघ्या पाच महिन्यांतच ऑलिम्पिक पदकांचा रंग उडाल्यामुळे जगभरातील पदकविजेते निराश झाले असून त्यात हिंदुस्थानच्या मनू भाकरचाही समावेश असून नव्या पदकांसाठी ती रंग उडालेली पदके आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) परत करणार आहे. आयफेल टॉवरच्या पोलादापासून बनवलेल्या या पदकांची निर्मिती फ्रान्सच्या मोनाई डे पॅरिस (फ्रान्सची राष्ट्रीय टकसाल) कंपनीने केली होती.

गेल्या काही दिवसांपासून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करणाऱया अनेक पदकविजेत्या आपल्या रंग उडालेल्या आणि खराब झालेल्या पदकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आयओसीकडे आपला राग व्यक्त केला होता. हळूहळू गेल्या आठवडाभरात शेकडो पदकविजेत्यांच्या पोस्ट पडल्यानंतर आयओसीसह पदक बनवणारी फ्रान्सची कंपनाही झोपेतून जागी झाली आहे. हिंदुस्थानच्या मनूच्याही पदकांची रंग उडाला आहे तर कुस्तीत हिंदुस्थानला पदक जिंकून देणाऱया पवन सेहरावतनेही आपल्या कांस्यपदकाने रंग बदलला असल्याची तक्रार केली आहे. जगभरातून ऑलिम्पिक पदकांच्या खराब झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर ‘आयओसी’ने पदकांना बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे. सेहरावतने आपल्या पदकाबाबत ‘आयओसी’ला अधिकृत तक्रार दिलेली नाही, मात्र तो आता तक्रार करणार असल्याचे कळले आहे.

फ्रान्सच्या एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच महिन्यांत शेकडो पदक विजेत्यांकडून पदके परत करण्यात आली आहेत. पदके जिंकल्यानंतर पदकांचा रंग उडू लागल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. आता हळूहळू जगभरातील सर्व पदक विजेत्यांच्या तक्रारींचा पाऊस पडत असल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांनी पदकांची तक्रार करणाऱ्या खेळाडूंच्या राष्ट्रीय संघटनांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्यांची पदके खराब झाली आहेत त्यांना तशीच नवी पदके दिली जाणार आहेत. मोनाई डी पॅरिस कंपनीने 5084 सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची निर्मिती केली होती.